धक्कादायक बातमी:नव्या कोरोनाचा भारतात शिरकाव,ब्रिटन रिटर्न 6 जण निघाले पॉझिटिव्ह

मुंबई, 29 डिसेंबर: वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एक धक्कादायक बातमी समोर येते आहेत. भारतात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे (New Coronavirus Strain) 6 रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं या रुग्णांमध्ये सापडली आहेत. एकूण 6 जणांच्या सॅम्पलपैकी 3 बेंगळुरूतील NIMHANS मध्ये, 2 हैदराबादमधील CCMB मध्ये तर एक पुण्यातील NIV मध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत.

राज्यातील यंत्रणा सतर्क

या सर्व व्यक्तींना संबंधित राज्य सरकारांनी नियुक्त केलेल्या आरोग्य सेवा सुविधांमध्ये आयसोलेटेड खोलीमध्ये ठेवण्यात आले आहे.त्यांचा ज्यांच्याशी संपर्क आला आहे, त्यांना देखील क्वारंटाइन करण्यात आले आहे. सहप्रवासी, कुटुंबातील सदस्य आणि इतरांचे ट्रेसिंग केले जात आहे शिवाय इतर नमुन्यांवर Genome sequencing सुरू आहे. भारतामध्ये नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्याने राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

INSACOG लॅबमध्ये टेस्टिंग आणि नमुने पाठवणे, आवश्यक नजर ठेवणे, काळजी घेणे यांसारख्या बाबींमध्ये राज्यांना वेळोवेळी सल्ला देण्यात येत आहे. या परिस्थितीत विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.
गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोव्हिड-19 संदर्भात योग्य खबरदारी घेण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना त्यांनी 31 जानेवारीपर्यंत लागू केल्या आहेत. नववर्ष आणि हिवाळ्याच्या हंगामात कोरोनाच्या आणखी केसेस वाढू नये याकरता केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कठोर दक्षता पाळण्यास सांगितले आहे.


error: Content is protected !!