देश

ग्रामीण भागातील 50 टक्‍के जनता अर्धपोटी

नवी दिल्ली: सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक प्रकारच्या अडचणी उद्‌भवल्या आहेत. त्यातच लोकांना आता पुरेसे अन्नही मिळेनासे झाले आहे. एका पहाणी नुसार ग्रामीण भागातील 50 टक्के जनतेवर सध्याच अर्धपोटी राहण्याची वेळ आली आहे. 12 राज्यातील 47 जिल्ह्यांमध्ये प्रातिनिधीक स्वरूपात पाच हजार कुटुंबांच्या मुलाखती घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

त्यानुसार ग्रामीण भागातील 68 टक्‍के लोकांना आपल्या भोजनातील पदार्थांची संख्या कमी करावी लागली आहे. यातील 84 टक्‍के लोकांना सार्वजनिक वितरण सेवेतून मिळणाऱ्या अन्नधान्यावर अवलंबून राहावे लागत असून 12 टक्‍के लोकांना मोफत अन्नधान्य मिळत आहे. खडेगावांतील 24 टक्‍के कुटुंबांना अन्नधान्याची उधार उसनवारी करून राहावे लागत आहे.

ग्रामीण भागातील बहुतांशी कुटुंबे रब्बी पिकांपेक्षा खरीपाच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. पण आता त्यांच्याकडील खरीपाच्या अन्नधान्याचा साठाही संपत चालला आहे. या लोकांना आता सार्वजनिक वितरण सेवेतून मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याचा पुरवठा करण्याची गरज आहे असे मतही या अहवालात नोंदवण्यात आले आहे. चालू वर्षातील खरीपाच्या पिकांची तयारी अत्यंत अपुऱ्या स्वरूपात झाली आहे. या पिकांच्या पेरणीसाठी पुरेसे साहित्य या लोकांकडे तयार नाही. त्यांना बी बियाणे आणि पतपुरवठाही करण्याची मोठ्या प्रमाणावर गरज आहे असेही या पहाणीतील अहवालात नमूद करण्यात आले आहे.अजूनही मोठ्या प्रमाणावरील स्थलांतरीत मजूर त्यांच्या मूळ गावी परत आलेले नाहीत. ते परत आल्यानंतर या लोकांची स्थिती आणखी बिकट होईल असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओडिशा, राजस्तान, उत्तरप्रदेश आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये ही पहाणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *