10 ऑक्टोबर पासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता !

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याने अधूनमधून हलक्या स्वरुपाचा पाऊस अनुभवायाला मिळतो. मात्र राज्याच्या अंतर्गत भागात 10 ऑक्टोबर पासून पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. तसंच मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, या भागांतही 10 ऑक्टोबरपासून पाऊस वाढण्याची शक्यता आहे. या भागात ढगांच्या गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई वेधशाळेने ही माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. दरम्यान, आज सकाळी विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातही पाऊसचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता होती.

आगामी चार दिवस राज्यातील तेरा जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत 10 ते 13 ऑक्टोबर या कालवधीत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने व्यक्‍त केला आहे. उर्वरित राज्यात मात्र हलका पाऊस पडेल, असे त्यांनी म्हटले आहे.

28 सप्टेंबर पासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, अधूनमधून पावसाचा अनुभव राज्यातील नागरिकांना येत आहे. 3-5 ऑक्टोबर दरम्यान मुंबईसह राज्यात पाऊस झाला. त्यानंतर आता 10 ऑक्टोबरपासून पुन्हा पाऊस वाढण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

यंदा हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात चांगला पाऊस झाला. दरम्यान, जुलै महिन्याच्या मध्यात, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आणि सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली. परिणामी पाणी टंचाईचे संकट दूर झाले आहेत. परंतु, अतिवृष्टीमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. तर शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान झाले आहे. यातच निसर्ग चक्रीवादळाची भर पडली. 3 जूनला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाने झोडपलं. यामुळे रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.


error: Content is protected !!