दिलासादायक! अनलॉक ३.०मध्ये सुरू होऊ शकतात ‘या’ गोष्टी

करोनानं देशाची दैनंदिनीच बदलून ठेवली आहे. करोनाचा प्रसार वाढत असल्याचं दिसून येताच केंद्र सरकारनं लॉकडाउन करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यानंतर तब्बल दोन ते अडीच महिने देश कडक लॉकडाउनमध्ये होता. त्यानंतर सरकारनं हळूहळू लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात झाली. त्याला सरकारनं अनलॉक असं संबोधलं होतं
सध्या देशात दुसरा अनलॉक सुरू आहे. केंद्र सरकारनं जाहीर केलेला हा अनलॉक ३१ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून नेमकं काय चित्र असेल, असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होऊ लागला आहे.
पहिल्या अनलॉकमध्ये महत्त्वाच्या सेवा आणि उद्योग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी केंद्रानं नियमावलीही जारी केली होती.पहिल्या अनलॉकमध्ये फारशी शिथिलता सरकारनं दिली नव्हती. मात्र, दुसऱ्या अनलॉकमध्ये बऱ्याच गोष्टी सुरू करण्यात आल्या होत्या.
रेस्टॉरंट, हॉटेल आणि मंदिर खुली करण्याची परवानगी सरकारनं दुसऱ्या अनलॉकमध्ये दिली होती. त्यासाठी काही नियमांची सक्ती करण्यात आली होती.
पहिल्या दोन अनलॉकमध्ये केंद्र सरकारनं लोकांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या काही बाबींना शिथिलता देण्यास नकार दिला होता. जसं की जीम, चित्रपटगृह.
१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्याविषयी इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्यानं वृत्त दिलं असून, त्यात शाळा आणि मेट्रो बंदच ठेवण्याची शक्यता आहे, असं म्हटलं आहे.
शाळा सुरू करण्याबद्दल केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालय सध्या देशभरातील राज्यांशी चर्चा करत आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या सचिव अनिता करवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती.
अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये केंद्र सरकारकडून जीम (व्यायामशाळा) सुरू करण्यास परवानगी मिळण्याची दाट शक्यता आहे.
त्याचबरोबर मार्चपासून बंद असलेली चित्रपटगृहही १ ऑगस्टपासून सुरू होऊ शकतात. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयानं चित्रपटगृहांच्या मालकांशी यासंदर्भात चर्चा करून केंद्रीय गृहमंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. चित्रपटगृह सुरू करण्याची शिफारस केलेली आहे. एकूण क्षमतेच्या ५० टक्के सीटनं चित्रपटगृह सुरू करण्यास तयार आहेत. तर केंद्र सरकारनं २५ टक्के सीट या प्रमाणे सुरू करावे असं म्हटलं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!