महाराष्ट्रात अघोषित आणीबाणीतर मग देशात घोषित आणीबाणी आहे का?-मुख्यमंत्रांचा सडेतोड सवाल
मुंबई – हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी, ‘महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू झाली आहे असं वातावरण आहे. सरकारच्या विरोधात बोललं की तुरुंगात टाकलं जातं आहे.’ असा गंभीर आरोप लगावला होता. फडणवीस यांच्या या आरोपावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला असून, ‘महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का?’ असा प्रतिप्रश्न विचारला आहे.
यावेळी बोलताना ठाकरे यांनी, ‘विरोधकांचं मागचं वर्ष सरकार कधी पडेल? किंवा सरकार कधी पडणार? याचे मुहूर्त शोधण्यात गेले. त्यामुळे सरकारने काय कामं केली त्याकडे त्यांचं लक्ष गेलं नाही’ असा टोला लगावला.
दरम्यान, दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून भाजपला लक्ष्य करताना ठाकरे यांनी, ‘दिल्लीत भर थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जात आहेत. ही काय सद्भावनेची गोष्ट आहे का?’ असा प्रश्न उपस्थित केला.
दरम्यान, ‘विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना ताब्यात घेण्यात विषयी आमच्या सरकारमधलं कुणीही काही बोललेलं नाही. देवेंद्र फडणवीस आम्हाला हे काही सुचवू पाहात आहेत का? देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पक्षात कोण हवं आहे आणि कोण नकोय हे सुद्धा कळत नाही. प्रविण दरेकर यांना ताब्यात घेण्याबद्दल फडणवीसांकडे काही पुरावे असतील तर ते त्यांनी जरुर द्यावेत’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचे आरोप धुडकावून लावले.