बीडच्या चिमुरड्या रीदम टाकळेची कामगिरी:साडे तीन तासात गाठले कळसुबाई शिखर

पुणे – बीडचा अवघ्या साडेचार वर्षांच्या रीदम टाकळे या मुलाच्या कामगिरीचे सध्या प्रचंड कौतुक केले जात आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीचे कळसूबाई शिखर रीदमने नुकतेच सर केले.

5 हजार 400 फूट उंचीचे हे शिखर त्याने केवळ 3 तास 38 मिनिटात सर केले. शिखरावर पोहोचल्यावर रीदमने तिरंगा फडकावला. गेल्या 29 नोव्हेंबरला त्याने सकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी शिखरावर चढाई सुरू केली व वाटेत एकदाही विश्रांती न घेता 11 वाजून 33 मिनिटांनी शिखर गाठले.

बालवाडीत शिकणारा रीदम याच्या या कामगिरीची चर्चा सध्या संपूर्ण राज्यात सुरू असून त्याचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. रीदम, त्याचे वडील गजानन टाकळे यांच्यासह गड कोट किल्ल्यांवर भटकंती करताना तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची व शौर्यगाथेवर व्याख्यान देतात.

गेल्या तीन महिन्यांत रिदमने राजगड, रायगड, लोहगड व सुधागडही सर केले आहेत. आता रिदम येत्या 25 डिसेंबरला हरिश्‍चंद्र गड सर करणार आहे. कळसूबाई सर केले त्या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये व्हावी, यासाठीही रिदमच्या पालकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे.


error: Content is protected !!