शासन निकषपात्र शाळांना अनुदान मंजूर करण्यासाठी अटीमध्ये सुधारणा
राज्यातील मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, तुकड्या, अतिरिक्त शाखा यांना 20 टक्के अनुदान देणे व 20 टक्के अनुदान सुरू असलेल्या शाळांना वाढीव टप्पा अनुदान देण्याबाबतच्या अटीमंध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
शाळा अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित झाली म्हणजे त्या शाळेस अनुदानाचा हक्क प्राप्त होत नाही. अनुदानासाठी पात्र घोषित केलेल्या शाळांना अनुदान मंजूर करण्याचा निर्णय हा शासनाचा स्वेच्छाधिकार असून निधीच्या उपलब्धतेनुसार शासन निकषपात्र शाळांना अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेणार आहे.
राज्यातील 276 प्राथमिक शाळा, 1031 तुकड्यांवरील 2 हजार 851 शिक्षकांची पदे, 128 माध्यमिक शाळांमधील 798 तुकड्यांवरील 2 हजार 160 शिक्षक व कर्मचारी, 1 हजार 761 उच्च माध्यमिक शाळांमधील 598 तुकड्या व 1 हजार 929 अतिरिक्त शाखांमधील 9 हजार 884 शिक्षक व कर्मचारी यांना 1 नोव्हेंबर 2020 पासून 20 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
20 टक्के अनुदान घेणाऱ्या 2 हजार 417 शाळा व 4 हजार 561 तुकड्यांवरील 28 हजार 217 शिक्षक व कर्मचारी यांना वाढीव 20 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.