वीज बील भरणासाठी नवीन योजना:खंडित वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याची संधी

महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर (कृषी वगळून) सर्व उच्च आणि लघुदाब वीजग्राहकांना थकीत, चालू वीजबिलांच्या रकमेचा भरणा करण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी नवीन योजना तयार केली असून, आर्थिक अडचणीत असलेल्या थकबाकीदारांना दिलासा देण्यात आला आहे. सोबतच खंडित वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याची संधी देण्यात आली आहे.

वीजपुरवठा सुरू असलेल्या ग्राहकांसोबतच तात्पुरता किंवा कायमस्वरुपी खंडित, वीजचोरी किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणातील ग्राहकांना सहभागी होता येईल. केवळ 2 टक्‍के रक्‍कम भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. उच्चदाब वीजग्राहकांना मंडल कार्यालय, 20 किलोवॅटपेक्षा अधिक वीजभार असलेल्या लघुदाब ग्राहकांना विभागीय कार्यालय आणि 20 किलोवॅटपर्यंत वीजभार असलेल्या लघुदाब ग्राहकांना उपविभाग कार्यालयांमध्ये अर्ज करून या योजनेत सहभागी होता येईल.

चालू वीजबिलाच्या रकमेचे हप्ते देण्याबाबत ग्राहकांच्या अर्जांवर 7 दिवसांत, तर वीजपुरवठा खंडित थकबाकीदारांच्या अर्जांवर 15 दिवसांत कार्यवाही होणार आहे.

यासोबतच महावितरणच्या वेबसाइटवर या योजनेचे लवकरच स्वतंत्र पोर्टल सुरू होत असून त्याद्वारेही ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या योजनेमध्ये तीन हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी डाऊन पेमेंट करण्याची गरज नाही. तसेच ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा सध्या सुरू आहे, मात्र वीजबिल थकीत आहे अशा आणि तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांनी 30 टक्‍के डाऊन पेमेंट करून या योजनेत सहभाग घेतल्यास त्यांना जास्तीत जास्त 12 सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध आहे.

सोबतच खंडित वीजजोडणी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये तात्पुरता वीजपुरवठा खंडित होऊन सहा महिन्यांपर्यंत कालावधी झाला असल्यास पुनर्जोडणी शुल्क भरून वीजजोडणी पुन्हा सुरू करता येईल. तर, सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून वीजपुरवठा खंडित असल्यास संबंधितांना नवीन अर्ज करावा लागेल आणि वीजजोडणी शुल्क भरून नवीन वीजजोडणी कार्यान्वित करता येईल. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडील थकबाकीच्या व्याजाची 50 टक्‍के रक्‍कम माफ होणार आहे.


error: Content is protected !!