स्पर्धा जरूर करा पण राज्यातून ओढूनताणून काही नेऊ देणार नाही-मुख्यमंत्री

महाराष्ट्रात काहीजण येत आहेत, पण त्यांना महाराष्ट्राची ‘मॅग्नेटिक’ ताकद काय आहे हे माहीत नाही. त्यामुळे इथले उद्योग त्यांच्याकडे जाणे दूरच राहिले. उलट त्यांच्याकडूनच आपल्याकडे उद्योग येतील. दुसरा कोणी पुढे जात असेल तर त्याबद्दल असुया नक्कीच नाही. स्पर्धा करा आणि पुढे जा! पण ओढूनताणून जर कोणी काही घेऊन जात असेल तर ते आम्ही नेऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी बजावले.

‘इंडियन मर्चंट चेंबर ऑफ काॅमर्स’ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपस्थित उद्योजकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री म्हणाले, मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी ‘इंडियन मर्चंट चेंबर ऑफ काॅमर्स’ पुढाकार घेत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे.


मॅग्नेटिक या शब्दात मोठी ताकद आहे. महाराष्ट्र हे एक वेगळे राज्य आहे. त्याला एक वेगळी संस्पृती आहे, संस्कार आहेत. त्यामुळे येथे येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाहीत, असे सांगतानाच अन्य राज्यातील उद्योग महाराष्ट्रात येतील असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी ‘मिशन एंगेज’ या पुस्तिकेचे तसेच ‘डिजिटल आर्ट’ या डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आयएमसीचे अध्यक्ष राजीव पोद्दार यांच्यासह इतर उद्योजक उपस्थित होते.

एक लाख कोटींचे उद्योग महाराष्ट्रात येतील

परवाना पद्धती सुलभ व्हावी यासाठी एक खिडकी पद्धत राबवत आहोत. आतापर्यंत आपण 60 हजार कोटींचे सामंजस्य करार केले. जूनमध्ये झालेल्या या करारांनुसार संबंधित उद्योजकांचे प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी लक्ष घातले जात आहे. पुढील काळात एक लाख कोटीहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.


error: Content is protected !!