ऑनलाइन वृत्तसेवा

मतदार नोंदणी,यादीतील नाव, पत्ता आदी दुरुस्त्या करण्याची संधी

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघांच्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. 17 नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. मतदार यादीतील नाव, पत्ता आदी दुरुस्त्या करण्याची संधी यामुळे मिळणार आहे.
1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित प्रारुप मतदार याद्या मंगळवार दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. प्रारुप मतदार याद्यांमध्ये ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केलेली नसतील असे मतदार नाव नोंदणीसाठी विहित नमुन्यात अर्ज करु शकतील.
तसेच या याद्यांतील नावांबाबत आक्षेप असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करावयाच्या असल्यासही दावे व हरकती दि. 15 डिसेंबरपर्यंत प्रत्येक विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) यांच्या कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत.
दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत दि. 5 जानेवारी 2021 पर्यंत आहे. डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई आदी दि. 14 जानेवारी 2021 पर्यंत करुन दि. 15 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. पुन:रिक्षण कार्यक्रमादरम्यान दोन शनिवार आणि दोन रविवारी प्रत्यक्ष मतदान केंद्रांच्या ठिकाणी विशेष मोहिमेचे (स्पेशल कॅम्पेन) आयोजनही करण्यात येणार आहे.
पूर्वीच्या मतदार यादीतील मयत झालेल्या, इतरत्र स्थलांतरीत झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. अशा वगळण्यात आलेल्या नावांची यादी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.
सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (बूथ लेव्हल एजन्ट- बीएलए) नेमणूक करावी आणि शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बूथ लेव्हल ऑफीसर- बीएलओ) यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे.
ऑनलाईन अर्ज नोंदणीची सुविधा http://www.nvsp.in या वेबपोर्टलवरही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.