कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतनाची किमान रक्कम पाच हजार रुपये मिळणार:आजच्या बैठकीत चर्चा

नवी दिल्ली : संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ‘एम्प्लॉइज पेन्शन फंड’ अंतर्गत देण्यात येणाऱ्या निवृत्तिवेतनाची किमान रक्कम पाच हजार रुपये करण्याबाबत बुधवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे.

संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ईपीएफओचा अधिक फायदा कसा करून देता येईल, यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची बुधवारी बैठक आहे. या बैठकीत प्रॉव्हिडंट फंडावर अधिक व्याज देणे, पेन्शनची किमान रक्कम पाच हजार रुपये करणे, ईपीएफओच्या निधीचे व्यवस्थापन, सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात येईल. त्याचप्रमाणे कोरोना संकट आणि त्याचा ईपीएफओवर झालेल्या परिणामांचा आढावाही समिती घेईल.
एम्प्लॉइज पेन्शन फंड’ अंतर्गत निवृत्तिवेतनाच्या किमान रकमेत वाढ करण्याची मागणी अनेक वर्षांपासून कामगार संघटना करीत आहेत. समितीने यासंदर्भात इतर देशांमध्ये काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याची माहिती कामगार मंत्रालयाला यापूर्वीच दिली आहे. ही समिती सर्व संबंधित मुद्द्यांवर चर्चा करून संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात अहवाल सादर करेल.

पेन्शनचे गणित
‘एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड’मध्ये कर्मचारी आणि कंपनीचे योगदान अर्धे-अर्धे असते. मूळ पगार आणि महागाई भत्ता यांच्या १२-१२ टक्के योगदान घेतले जाते. यापैकी कंपनी योगदानाच्या ८.३३ टक्के रक्कम ‘एम्प्लॉइज पेन्शन फंड’मध्ये जमा होते. या जमा रकमेवर निवृत्तिवेतन दिले जाते.


error: Content is protected !!