मेट्रो आठवडी बाजार आणि ग्रंथालयं सुरु करण्यासाठी परवानगी:नियमावली जाहीर

मुंबई-करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन राज्य सरकार टप्प्याटप्प्याने शिथील करत आहे. १ ऑक्टोबरपासून लॉकडानच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली असून ठाकरे सरकारकडून काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. दरम्यान राज्य सरकारने मेट्रो आणि ग्रंथालयं सुरु करण्यासाठीही परवानगी दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून नवं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालयं सुरु करण्यासाठी अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही, मात्र शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे.

परिपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, शाळा, महाविद्यालयं तसंच शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत.
दरम्यान शाळांना ५० टक्के शिक्षक तसंच इतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण, टेली काऊन्सलिंग याशिवाय इतर कामांसाठी शाळेत बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे. शाळा शिक्षण विभागाकडून यासंबंधी नियमावली जाहीर केली जाणार आहे.

सर्व सरकारी आणि खासगी ग्रंथालयांना करोनासंबंधित नियमांचं पालन करुन काम सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून ग्रंथालयं सुरु होणार आहेत. याशिवाय मेट्रोलाही टप्याटप्याने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

याशिवाय आठवडी बाजार भरवण्यासही परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून कंटेनमेंट झोनच्या बाहेर आठवडी बाजार भरवला जाऊ शकतो असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. याशिवाय दुकानं दोन तास अतिरिक्त उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे दुकानं सकाली ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु राहू शकतात. राज्य सरकारने परिपत्रकात मुंबई लोकल तसंच धार्मिकस्थळांचा उल्लेख केलेला नाही.

राज्य सरकारने याआधी जाहीर केलेली नियमावली –

  • ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेत उपहारगृहे, फूड कोर्ट आणि बार सुरु करण्यास परवानगी.
  • राज्यांतर्गत रेल्वेसेवा (मुंबई-पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, रत्नागिरी) सुरु करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी.
  • मुंबईच्या धर्तीवर पुणे शहरातील उपनगरीय रेल्वे सेवा सुरु .
  • मुंबईतील डबेवाल्यांना क्यूआर कोडच्या माध्यमातून रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी.
  • मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या हद्दीतील सर्व उद्योग, आस्थापना सुरु करण्यास मुभा.
    -चित्रपटगृहं १५ ऑक्टोबरपासून सुरु कऱण्यासाठी केंद्राने परवानगी दिली आहे. राज्याने मात्र यासाठी नकार दिला आहे.
  • व्यायामशाळा सुरु करण्यासाठी केंद्राने याआधीच परवानगी दिली आहे, राज्याने मात्र यासाठी अनुमती दिलेली नाही.
  • तरणतलाव, नाट्यगृह, सभागृह, राजकीय, क्रीडा, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम बंदच राहणार आहेत.


error: Content is protected !!