देशनवी दिल्ली

गुडन्यूज:कोरोना लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात वर्षाच्या सुरुवातीलाच लस उपलब्ध

देशभरातील कोरोना विषाणू संक्रमित लोकांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत असतानाच आणखी एक चांगली बातमी आली आहे.
भारत बायोटेक’ कंपनीच्या कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लवकरच सुरु होईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हंटले आहे. तसेच ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात असून याचे परिणाम नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत दिसून येतील असेही आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोरोना लसीच्या खरेदीबाबत प्रश्न विचारण्यात आला असता आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण म्हणाले की, लस तयार करणाऱ्यांना प्री-क्लिनिकल ट्रायलसाठी आर्थिक सहाय्य केले जाईल असे म्हटले. तसेच पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत लस उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांबाबत बोलताना ते म्हणाले की, यातील 10 टक्के मृत्यू 26 ते 44 वर्ष वयोगटातील आहेत, तर 35 टक्के मृत्यू 45 ते 60 वर्ष वयोगटातील नागरिकांचे आहेत. तरुणांच्या मृत्यूच्या टक्केवारीबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली. तसेच दिलासादायक म्हणजे आजपर्यंत 62 लाखांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले असून 9 लाखांहून कमी पॉझिटिव्ह केसेस आहेत. तसेच सध्या दिवसाला 11 लाख 36 हजार चाचण्या करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.