पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रिय सशस्त्र पोलीस दलाची मागणी

पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी केंद्रीय पोलीस दलाची मदत घेतली जाणार

मुंबई: लॉकडाऊनमुळं राज्यातील पोलिसांवर पडणारा अतिरिक्त ताण लक्षात घेऊन त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) २० कंपन्या पाठवण्याची मागणी केंद्र सरकारकडं केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ही माहिती दिली.

गेले जवळपास दोन महिने राज्यातील पोलीस अहोरात्र कार्यरत आहेत. लॉकडाऊनचे नियम कठोरपणे राबवण्याची जबाबदारी सांभाळतानाच पोलिसांना कायदा व सुव्यवस्थेकडंही लक्ष द्यावं लागत आहे. त्यामुळं त्यांच्यावर अतिरिक्त ताण येत आहे. त्यातच राज्यात एक हजारांहून अधिक पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. करोनामुक्त झालेल्या पोलिसांना काही दिवस क्वारंटाइन राहावं लागणार आहे. शिवाय, अनेक पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. सध्या रमजानचा सणही सुरू आहे. अशा स्थितीत कायदा-सुव्यवस्था राखण्याचंही आव्हान आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारनं केंद्राची मदत मागितली आहे.

देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारनं २० तुकड्यांची म्हणजेच, किमान २ हजार जवान पाठवण्याची मागणी केंद्राकडं केली आहे. राज्यात सध्या राज्य राखीव पोलीस दलाच्या ३२ कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने पोलीस दल काम करत आहे कैक पोलीसांना कोरोनाची लागण झालीय, त्यांच्या
कामाची वेळ व आव्हानंही दिवसागणिक वाढतायत व रमज़ान ईद ही येऊ घातली आहे. म्हणूनच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याने तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्यांची केंद्राकडे मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडंच फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं होतं. मुंबईत लष्कर बोलवलं जाणार नाही, असं त्यावेळी ते म्हणाले होते. मात्र, गरज पडल्यास पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी केंद्रीय पोलीस दलाची मदत घेतली जाईल, असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार राज्यानं ही मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!