सरकारी कर्मचारी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार एका दिवसाचं वेतन

मुंबई: करोनामुळं आर्थिक संकटात सापडलेल्या राज्य सरकारच्या मदतीला सरकारी कर्मचारी धावून आले आहेत. सर्व सरकारी कर्मचारी मे महिन्यातील एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत देणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

करोनाला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता जवळजवळ सर्वच सेवा ठप्प आहेत. त्यामुळं राज्याला मिळणाऱ्या महसुलात मोठी घट झाली आहे. सरकारची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. या अडचणीच्या काळात राज्य सरकारी कर्मचारी सरकारच्या मदतीला धावून आले आहेत. सरकारला आर्थिक मदत हवी म्हणून, राज्यातील सर्व कर्मचारी मे महिन्यातील एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत देणार आहेत. संघटनेच्या वतीने राज्य सरकारला निवेदन देऊन कळवण्यात आले आहे. जवळपास साडेपाच लाख कर्मचाऱ्यांचे अंदाजे ३०० कोटी रुपये या निधीत जमा होणार आहेत.

आर. जी. कर्णिक प्रणित राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना गेली ५८ वर्षे कर्मचारी आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करत आहे. करोना संकटाच्या काळात मार्चचे वेतन २५ टक्के कमी घेऊनही अहोरात्र सेवा व इतर जनताभिमुख सेवा देण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी कधीच कुचराई केली नाही. आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर संघटनेने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केलं आहे. तसंच मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान दिल्याबद्दल सरकारी कर्मचारी आणि संघटनेचे आभार मानले, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर आणि सुरेंद्र सरतापे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!