लॉकडाऊन वाढणार? मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचे संकेत

नवी दिल्ली/वृत्तसेवा

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन पुन्हा वाढवण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. लॉकडाऊन आताच संपवून चालणार नाही. करोना व्हायरसवर अद्याप कुठलेही औषध मिळालेले नाही. यामुळे आपल्याला मनोवैज्ञानिक पद्धतीने करोनाचा सामना करावा लागले, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत. यामुळे १८ मेपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होऊ शकतो, असे संकेत मोदींनी दिलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र, पंजाबसह काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली.

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा हा १७ मे रोजी संपत आहे. पण लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत देताना पंतप्रधान मोदींनी राज्यांना काही प्रमाण सूटही दिली. राज्यांनी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी १५ मेपूर्वी केंद्र सरकारला आराखडा सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांना मोदींनी दिल्या. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांवर लॉकडाऊनमधील नियम करावे लागतील. राज्यांनी परिस्थितीनुसार बदल करावेत. अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांसाठी रेल्वे आणि बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तसंच रेल्वे वाहतूक हळूहळू सुरू करणार असल्याचं मोदींनी सांगितलं. एकम मात्र, रेल्वे वाहतूक सुरू करण्यास चार राज्यांनी या बैठकीत विरोध केला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानी स्वामी, आंध्रचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी रेल्वे वाहतूक सुरू करू नये, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या नियमांसह सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले पाहिजे, असं आवाहन राज्यांना केलं आहे. लॉकडाऊनसोबत आर्थिक उलाढालींनाही गती दिली पाहिजे, असं पंतप्रधान मोदी या बैठकीत म्हणाले.
केंद्र सरकार जो काही निर्णय घेईल त्याचे पालन आम्ही करू. पण मे अखेपर्यंत लॉकडाऊन वाढवा, अशी मागणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे, अशी माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!