‘मी लॉकडाऊन उघडतो, लोकं मृत्यूमुखी पडली तर जबाबदारी घ्याल का?’ : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : राज्यात काही शहरांमध्ये टप्प्या टप्यात लॉकडाऊन केला जात आहे. यावरुन काहीजण सरकारवर टीका करत आहेत. याविषयी संजय राऊत यांनी मुलाखतीत प्रश्न केला असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, एका बाजूला लॉकडाऊन केला पाहिजे का?, तर त्याला विरोध करणारे अनेक शहाणे आहेत. लॉकडाऊनने काय साधलं?, लॉकडाऊन म्हणजे उपचार आहे का?, लॉकडाऊनने आर्थिक संकट येत आहे, लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला. ठीक आहे बाबा, आम्ही तुम्हाला उघडून देतो. मात्र त्यानंतर दुर्देवाने लोकं मृत्यूमुखी पडले तर तुम्ही घेणार का त्याची जबाबदारी?, असा सवाल त्यांनी केला आहे.

जे आज सरकारच्या दारी येऊन बसले आहेत. दार उघडं म्हणून टाहो फोडत आहेत, त्यांना इतकचं सांगेन की दारं उघडायला हरकत नाहीय. पण दारं उघडल्यावर तुम्ही जबाबदारी घेणार आहात का?, असा सवाल देखील त्यांनी लॉकडाऊनवरुन टीका करणाऱ्यांना केला आहे.
राऊत यांनी ठाणे, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ यासारख्या मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांबरोबरच अगदी पिंपरी चिंचवड, चंद्रपूरसारख्या ठिकाणाही पुन्हा लॉकडाउन करावं लागलं आहे. तर अशाप्रकारे परत परत लॉकडाउन करण्याची वेळ का येत आहे?, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, शहरं लॉकडाउन करण्याची वेळ आपल्यावरच आलेली नाहीय. हे जागतिक कटू सत्य आहे की या विषयावर नेमकेपणे सल्ला देणारं आणि बोलणारं जगामध्ये कोणीच नाहीय, असं ते म्हणाले.
अर्थव्यवस्थेची चिंता करतायत त्यांनी आरोग्याची थोडीफार तरी चिंता करावी
ते म्हणाले की, मी असं कधीच म्हणणार नाही की लॉकडाऊन उठवतोय. मी अजिबात असं म्हणणार नाही. पण मी हळूहळू एक एक गोष्टी उघडत चाललो आहे. माझा प्रयत्न असा आहे की एकदा उघडलेली गोष्ट बंद होता कमा नये. त्यामुळे नुसता आरोग्याचा किंवा नुसता अर्थव्यवस्थेचा विचार करुन चालणार नाही. जे केवळ अर्थव्यवस्थेची चिंता करतायत त्यांनी आरोग्याची थोडीफार तरी चिंता केली पाहिजे. तसेच जे केवळ आरोग्याची चिंता करत आहेत त्यांनी आजच्या घडीला हे जरी सत्य असलं तरी थोडी आर्थिक चिंता पण करायला हवी. या सर्वाचं तारतम्य ठेऊन विचार केला पाहिजे. ही तारेवरची कसरत आहे. करोनाबरोबर जगायला शिकायचं म्हणजे ही तारेवरची कसरत करायला शिकलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

शहरं आणि परिसर कालांतराने संकटातून बाहेर पडतील
ठाकरे म्हणाले की, मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील प्रादुर्भाव वाढतोय. तुम्ही या विषाणूच्या वागणुकीचा आलेख पाहिला तर एक गोष्ट लक्षात येईल की हा गुणाकार करत जातोय. जिथे पाहिली सुरुवात होते तिथे तो शिखरावर जातो. त्यानंतर तो कर्व्ह फ्लॅट होऊन कमी होतो. जिथे उशीरा सुरु होतो संसर्ग तिथे तो उशीरा शिखरावर जातो. या मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जिथे उशीरा सुरु झालं आहे तिथे तो उशीराने शिखरावर चालला आहे. त्यामुळे ही शहर आणि परिसर कालांतराने बाहेर पडतील, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!