दिलासा !भारतात विकसीत लसीचा ३० वर्षीय युवकाला दिला पहिला डोस
नवी दिल्ली: कोरोनाचा कहर जगभर सुरु असताना काही आनंदाच्या बातम्या देखील समोर येत आहे. जगभरातील औषध कंपन्या कोरोना विरोधात लस शोधत आहेत. यातील काही कंपन्या यशाच्या जवळ आहेत. भारतातील ‘भारत बायोटेक’ या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी ‘कोवॅक्सिन’ ही लस तयार केली आहे. या लसीच्या मानवी चाचणीस एम्स रुग्णालयात सुरुवात करण्यात आली आहे.
एम्स रुग्णालयात ३० वर्षीय स्वयंसेवकाला या स्वदेशी लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. स्वयंसेवकाला दोन तास रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. इंडिया टुडेने, याबाबत वृत्त दिले आहे.
लसीचा पहिला डोस देण्यात आलेल्या स्वयंसेवकाला रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर घरी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर सात दिवस लक्ष ठेवण्यात येईल. डोस देण्याआधी करण्यात आलेल्या स्क्रिनिंग आणि टेस्टमध्ये संबंधित ३० वर्षीय व्यक्ती पात्र ठरली होती.