महाराष्ट्र

जागा एकच इच्छुक 123

कॉग्रेसमध्ये एका जागेसाठी रस्सीखेच;कुणाची वर्णी लागणार!

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होणार असून संख्याबळानुसार काँग्रेस केवळ एका जागेवर विजय मिळवू शकतो. मात्र, या एका जागेसाठी पक्षातले १२३ जण इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. परिषदेची निवडणूक एप्रिलच्या महिना अखेरीला गृहीत धरून पक्षाने इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल १२३ कार्यकर्त्यांनी पक्षाकडे परिषदेवर संधी मिळावी, अशी विनंती केली आहे. यासंदर्भात जेष्ठ काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधला असता, ही पक्षाची अंतर्गत बाब आहे, याबाबत जाहीर बोलणे पक्ष शिस्तीचा भंग होऊ शकतो, असे सांगण्यात आले.

काँग्रेसमध्ये काही दिगग्ज नेते ही विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचे चर्चिले जात आहे. यात माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ही पक्ष श्रेष्ठीकडे परिषदेवर संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर भटक्या विमुक्त समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे हरिभाऊ राठोड यांना पक्षाने पुन्हा संधी द्यावी, अशी इच्छा आधीच व्यक्त केली आहे. त्याचबरोबर पुण्यातून माजी आमदार मोहन जोशी यांनीही परिषदेवर जाण्यासाठी दिल्लीतही फिल्डिंग लावली असून त्यांचे पारडे जड असल्याचे पक्षात बोलले जात आहे. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात १२३ कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज केले आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातही अचंबित झाले असून आता कुणाच्या नावाची शिफारस करायची, असा प्रश्न त्यांनाही पडला असून आता सारी भिस्त दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींवर असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *