महाराष्ट्र

येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांची फी वाढ नाही – राज्य शासनाचा पालकांना दिलासा


 
मुंबई,  
कोरोनाविषाणू संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळं आर्थिक संकट निर्माण झालेले असताना राज्य शासनाने पालकांना दिलासा दिला आहे. येत्या शैक्षणिक वर्षासाठी फी वाढ न करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात आले आहेत.


 राज्यात सध्या लॉकडाउन सुरु असल्याने काही शैक्षणिक संस्था पालकांना विद्यार्थ्यांची फी भरण्याची सक्ती करीत आहेत. याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारांची दखल घेत शासनाने सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची व आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करुन नये, असे निर्देश दिले आहेत.
राज्य शासनाने शाळांच्या फीबाबत पुढील निर्देश दिले आहेत
पालकांच्या सोईसाठी शाळांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ या काळातील शिल्लक फी एकाच वेळी न घेता मासिक किंवा त्रैमासिक पद्धतीने जमा करण्याचा पर्याय पालकांना उपलब्ध करुन द्यावा.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१साठी कोणतीही फी वाढ करु नये.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी जर काही शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही तसेच त्यासाठीचा खर्च कमी होणार असेल तर पालकांच्या कार्यकारी समितीमध्ये (ईपीटीए) ठराव करुन त्याप्रमाणे योग्य प्रमाणात फी कमी करावी.
लॉकडाऊनच्या काळात गैरसोय टाळण्यासाठी पालकांना ऑनलाइन फी भरण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा.
वरील आदेश सर्व बोर्डाच्या, सर्व माध्यमांच्या व पूर्व प्राथमिक ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लागू असतील, असे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *