राज्यपाल नियूक्त सदस्यांसाठी महाआघाडी आक्रमक

मुंबई – कोरोनाच्या आपत्तीमुळे लांबणीवर पडलेल्या विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीसाठी महाविकासआघाडी सरकार आता आक्रमक होणार आहे. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकात आज महाविकासआघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीअंती आमदारांची नियुक्ती तातडीने व्हावी, यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे आग्रह धरण्याचे निश्‍चित झाल्याचे समजते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात या मुद्द्यावर बराचवेळ चर्चा सुरु होती. नंतर या बैठकीत शिवसेना नेते एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे हेदेखील सहभागी झाले. राज्यपालांनी या प्रक्रियेसाठी वेट ऍन्ड वॉचची भूमिका घेतली असली तरी आता फारच उशीर होत असल्याने राज्य सरकार आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्यपालांना विनंती करणार आहे.

महाविकास आघाडीचा सध्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्‍चित होत नाही. शिवसेना आणि कॉंग्रेसची 5 जागांची मागणी आहे. कारण शिवसेनेनं राष्ट्रवादीला राज्यसभा निवडणुकीत आपली मतं दिली होती. त्यामुळे शिवसेना 5 जागांसाठी आग्रही आहे. तर नुकत्याच झालेल्या विधानपरिषद जागांसाठी कॉंग्रेसला 2 जागांचा आग्रह असताना एका जागेवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी कॉंग्रेसनं पाच जागांचा आग्रह धरला आहे. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसनं तीनही पक्षांना समसमान वाटप व्हावं ही भूमिका घेतली आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यपाल नियुक्त सदस्यांचा कार्यकाल संपला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!