कोरोना होऊच नये असे वाटते का?मग दहशत नको, दक्षता हवी!

जागतिक आरोग्य संघटनेने महामारी म्हणजेच साथीचा रोग म्हणून घोषित केलेला करोना (कोविड -19) हा विषाणूजन्य आजार आतापर्यंत जवळपास 145 हून अधिक देशांत पसरला आहे. जगभरात सुमारे 1.45 लाख जणांना याची लागण झाली असून पाच हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या जगभरातच भीतीचे वातावरण पसरले आहे. वास्तविक, ही वेळ घाबरुन जाण्याची नसून एकजुटीने प्रयत्न करुन आणि उपाययोजनांची शिकस्त करुन जागतिक संकट बनलेल्या या आजारावर मात करण्याची आहे. त्यादिशेने सर्वच देशांमधील सरकारे आणि यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहेत आणि त्या प्रयत्नांना यशही येताना दिसत आहे. ज्या चीनच्या वुहानमध्ये करोनाचा उगम झाला, त्या चीनने या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा जागतिक आरोग्य संघटनेनेही केली आहे.

8 डिसेंबर 2019 रोजी वुहानमध्ये करोनाचे पहिले प्रकरण समोर आले. परंतु त्यावर कारवाई करण्यासाठी 14 जानेवारी उजाडला. वुहानमध्ये सार्ससारखा विषाणूजन्य आजार पसरत असल्याचे चीनमधील ली वेनलियांग या नेत्ररोगतज्ज्ञाने सर्वप्रथम सांगितले. परंतु त्याला गप्प राहण्याचे आदेश देण्यात आले आणि सरकारने अफवा पसरवल्याबद्दल त्याला दंडही केला. मात्र लवकरच ही अफवा नसून वास्तव असल्याचे लक्षात आले. त्यानंतर चीनने कमालीच्या वेगाने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली. तोपर्यंत हा आजार जगभरात पसरला असला तरी आता चीनने तो नियंत्रणात आणण्यात यश मिळवले आहे. मार्च महिन्यामध्ये करोना संक्रमण झालेले अवघे 12 नवे रुग्ण चीनमध्ये आढळले आहेत.

भारतातही केंद्र आणि राज्य सरकारांनी गाफिल न राहता झपाट्याने पावले टाकत करोनाचा सामना सुरु केला आहे. करोनाची लागण झाली आहे की नाही हे घशातील द्रव पदार्थांचे नमुने तपासल्यानंतर समजते. यासाठी ते प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू निदान संस्थेत (एनआयव्ही) त्याचे निदान होते. करोनाचा वाढता धोका लक्षात आल्यानंतर देशात आतापर्यंत अशा 14 प्रयोगशाळांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. जवळपास 11 हून अधिक राज्यांमध्ये नागरिकांची संभाव्य गर्दी टाळण्यासाठी संचारबंदीसदृश आदेश देण्यात आले आहेत. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची कसोशीने तपासणी करण्यात येत असून गरजेनुसार त्यातील बाधितांचे विलगीकरण केले जात आहे. महाराष्ट्रातही विविध धार्मिक यात्रा, सांस्कृतिक -राजकीय कार्यक्रम, सभा आदी सर्वांवर बंदी घालण्यात आली आहे.

पूणे-मुंबई येथे सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळेच जगभराचा विचार करता कोरोना आजाराने होणारे मृत्यू रोखण्यात भारत आघाडीवर असल्याचे दिसते. अमेरिकेसारख्या जागतिक महासत्ता असणाऱ्या देशात 5.9 टक्‍के मृत्यूदर असताना भारतात तो 0.2 टक्‍क्‍यांवर ठेवण्यात आपल्याला यश आले आहे. या प्रयत्नांबद्दल शासन यंत्रणा अभिनंदनास पात्र आहेत. पण करोनाशी लढाई अद्याप संपलेली नाही. आता कुठे तिची सुरुवात आहे. ही लढाई जिंकण्यासाठी शासनाला जनतेची साथ अत्यावश्‍यक आहे. करोनासंदर्भात सतत प्रसारित होणाऱ्या वृत्तांमुळे भयभीत न होता या विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याबाबत सर्वांनीच सजग होण्याची नितांत आवश्‍यकता आहे.

आजवर आलेल्या अनेक संकटांचा आपण एकजुटीने, धिरोदात्तपणे सामना करून ती परतवून लावली आहेत. तशीच वेळ आता पुन्हा आली आहे. करोनावर अद्यापपर्यंत प्रतिबंधात्मक लस विकसित करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे त्याचा संसर्ग-प्रसार रोखणे आणि बाधितांवर उपचार करून त्यांना करोनामुक्‍त करणे हेच आपल्या हाती आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, करोनाचा मृत्यूदर हा अत्यंत कमी आहे. मागील काळात आलेल्या चिकुनगुनिया, स्वाइन फ्ल्यू यांसारख्या आजारांचा मृत्यूदर हा जवळपास 10 टक्‍के होता; परंतु करोनाचा मॉर्टेलिटी रेशो अवघा 2.5 ते 3 टक्‍के आहे. याचाच अर्थ 100 जणांना करोनाची लागण झाली असल्यास त्यातील सरासरी तीन जणांचा मृत्यू होण्याची शक्‍यता असते. त्यातही वयोवृद्ध नागरिक व लहान मुलांना याचा धोका अधिक असतो. याखेरीज, मधुमेह, कर्करोग, हृदयरोग अशा काही आजारांनी आधीपासूनच बाधित असल्यास अशा व्यक्‍तींनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.

सध्याच्या काळात अशा रुग्णांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी, मुलांनी कटाक्षाने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे योग्य ठरणार आहे. कारण करोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे एकाकडून दुसऱ्याकडे या विषाणूचा संसर्ग होतो. खोकणे, शिंकणे, थुंकणे या माध्यमातून करोनाच्या विषाणूंचा प्रसार होतो. त्या विषाणूंच्या संपर्कात असलेल्या वस्तू, व्यक्‍ती किंवा पदार्थावर ते विषाणू जाऊन बसतात. तसेच हवेतूनही करोनाचे विषाणू पसरत असल्यामुळे नाकावाटे, तोंडावाटे करोनाची बाधा होऊ शकते. म्हणूनच यासंदर्भात आरोग्यतज्ज्ञांकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्‍यक आहे. येणारे काही दिवस प्रत्येकानेच ठराविक वेळाने हॅंडवॉश किंवा सॅनिटायझरच्या साहाय्याने हात स्वच्छ धुवावेत. हे धुताना हाताची बोटे, मनगट, बोटांमधील बेचक्‍यातील भाग साबणाचा भरपूर फेस करून स्वच्छ धुवावे आणि स्वच्छ कोरड्या नॅपकिनने ते पुसावेत. खोकणाऱ्या आणि शिंकणाऱ्या व्यक्‍तींपासून साधारण तीन ते चार फूट दूर अंतर राहावे. तसेच आपल्याला शिंक अथवा खोकला आल्यास तोंडावर रुमाल धरावा.

या विषाणूची श्‍वसनावाटे बाधा होत असल्यामुळे खबरादीचा उपाय म्हणून तोंडाला मास्क वा रुमाल बांधावा. तसेच शक्‍य असल्यास हॅंडग्लोव्हजचा वापर करावा. याखेरीज धूम्रपान, मद्यपान टाळणे, किरकोळ स्वरूपाच्या सर्दी-खोकला-ताप यांकडे दुर्लक्ष न करणे, गरजेशिवाय घराबाहेर न पडणे आदी गोष्टी खबरदारीचा उपाय म्हणून गरजेच्या आहेत. एक गोष्ट सर्वांत महत्त्वाची लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे करोनाची लागण झाली की मृत्यू अटळ आहे अशा गैरसमजात राहू नये.

नुकतेच भारतात करोनाबाधित 13 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून ते आता ठणठणीत बरे झाले आहेत. त्यामुळे योग्य वेळी निदान आणि योग्य वेळी नेमके उपचार झाल्यास करोनावर मात करता येते. त्यासाठी गरज आहे ती इच्छाशक्‍तीची आणि सतर्कतेची. नुकतेच पुण्यातील राष्ट्रीय विषाणू निदान संस्थेने करोनाशी सुरू असलेल्या लढाईतील एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. या संस्थेने हा महाविघातक विषाणू मानवाच्या शरीराबाहेर ठेवण्यात सफलता मिळवली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत करोनावर प्रभावी औषध विकसित होण्याची आशा पल्लवित झाली आहे. जगभरातील पाचच देशांना ही उपलब्धी मिळाली आहे. येणाऱ्या काळात करोनावर लसही विकसित होऊ शकेल, असा विश्‍वास शास्रज्ञांनी व्यक्‍त केला आहे. त्यामुळे करोनाविरुद्धचा हा लढा आपण लवकरच जिंकणार आहोत, पण तोपर्यंत गरज आहे ती सर्वंकष सामूहिक प्रयत्नांची.

श्रीकांत देवळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!