देशात 10 लाख लोकसंख्येमागे केवळ 505 करोनाबाधित
नवी दिल्ली -जगभरात 10 लाख लोकसंख्येमागे सर्वांत कमी करोनाबाधितांची नोंद झालेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. भारतात ते प्रमाण 505.37 इतके आहे. तर सरासरी जागतिक दर 1453.25 इतका आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) स्थिती अहवालाचा आधार घेऊन संबंधित माहिती दिली. पेरू आणि चिली यांसारख्या छोट्या देशांतही लोकसंख्येच्या तुलनेत बाधितांची संख्या मोठी आहे. चिलीमध्ये 10 लाख लोकसंख्येमागे 15 हजार 459 तर पेरूमध्ये 9 हजारांहून अधिक बाधित आढळले आहेत. जगात सर्वांधिक बाधित असणाऱ्या अमेरिकेत ते प्रमाण 8 हजार 560 इतके आहे.
ब्राझील आणि रशियातील प्रमाण अनुक्रमे 7 हजार 419 आणि 4 हजार 713 आहे. डब्लूएचओच्या अहवालानुसार भारतातील करोनामृत्यूदरही अतिशय कमी आहे. भारतात 10 लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण 14.27 इतके आहे. तर सरासरी जागतिक मृत्यूदर भारताच्या जवळपास पाचपट म्हणजे 68 टक्क्यांहून अधिक आहे. ब्रिटनमध्ये करोनामृत्यू दर सर्वांधिक 651 इतका आहे. जगात सर्वांधिक बळींची नोंद झालेल्या अमेरिकेतील मृत्यूदर 391 आहे.