आनंदाची बातमी! अमेरिकन कंपनीकडून भारतासाठी स्वस्तातील रेमडेसिविर

वॉशिंग्टन: करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे भारतात चिंता व्यक्त केली जात आहे. सर्वाधिक करोनाबाधितांच्या संख्येत भारत आता तिसऱ्या स्थानी असून वाढत्या मृत्यूदरामुळे चिंता व्यक्त केली जात असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. करोना आजारावर मात करण्यासाठी महत्त्वाचे समजले जाणारे रेमडेसिविर औषध भारतात आता स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. अमेरिकन कंपनीकडून रेमडेसिविरचा पुरवठा होणार आहे.
अमेरिकन औषध कंपनी मायलिन एनव्हीने ही घोषणा केली आहे. औषध कंपनी असलेल्या गिलिएड सायन्सचे अॅण्टी व्हायरल औषझ रेमडेसिविरचे जेनेरिक व्हर्जन भारतीय रुग्णांसाठी तयार करण्यात आले आहे. भारतात या औषधाची किंमत ४८०० रुपये असणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
मागील महिन्यात दोन भारतीय औषध निर्मिती कंपनी सिप्ला आणि हेटोरो लॅब्सनेदेखील रेमडेसिविरचे जेनेरिक व्हर्जन लाँच केले होते. सिप्लाच्या औषधाची किंमत पाच हजार रुपयांच्या आसपास होती. तर, हेटेरो लॅब्सने आपल्या कोविफोर या औषधाची किंमत ५४०० रुपये निश्चित केली होती. अमेरिकेतील मायलिन एनव्ही कंपनीने भारतीय रुग्णांसाठी तयार केलेल्या रेमडेसिविर औषधाची किंमत ही इतर श्रीमंत देशांच्या तुलनेने जवळपास ८० टक्के कमी आहे. कॅलिफोर्नियातील गिलिएड सायन्सने अनेक जेनेरिक औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यासोबत करार केला आहे. जेणेकरून जवळपास १२७ विकसनशिल देशांमध्ये औषध पुरवठा करता येऊ शकतो. आगामी तीन महिन्यांसाठी अमेरिकेने जवळपास सर्वच रेमडेसिविर औषध खरेदी केले आहे. त्या पार्श्वभूमीवर इतर विकसनशील देशांच्या औषध पुरवठ्याबाबत प्रश्न निर्माण झाले होते.भारतीय रुग्णांसाठी तयार करण्यात येणाऱ्या रेमडेसिविर औषधाची निर्मिती भारतातच करण्यात येणार आहे. त्याशिवाय इतरही १२७ विकसनशील देशांसाठी औषध पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. भारतात ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ ने रेमडेसिविर ‘डेसरेम’ (DesRem)नावाने मंजूर केले आहे. मायलीन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ही किंमत १०० मिलीग्रॅम औषधाची (छोटी कुप्पी) आहे. एका रुग्णाला साधारणपणे किमान पाच दिवस औषधांचा कोर्स सुरू केल्यास सहा छोट्या कुप्पींची गरज भासते.
रेमडेसिवीर औषध हे इबोलाच्या आजाराला मात देण्यासाठी विकसित करण्यात आले होते. या औषधाने आणखीदेखील काही संसर्गजन्य आजारांवर मात करता येऊ शकते अशीही चर्चा आहे. ‘रेमडेसिविर’ औषधं नियमितपणे पाच दिवसांसाठी घेणाऱ्या रुग्णांवर याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला आहे. साधारण उपचार दिल्या जाणाऱ्या रुग्णांपेक्षा ‘रेमडेसिविर’चा डोस घेणाऱ्यांमध्ये याचा चांगला परिणाम दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!