महाराष्ट्रमुंबई

बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत आणि दहावीचा जुलै अखेरपर्यंत लागण्याची शक्यता

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. लॉकडाऊनचा परिणार शिक्षण व्यवस्थेवरही झाला आहे. शैक्षणिक वर्ष सुरु झालं असलं तरी अद्याप शाळा, कॉलेज सुरु झालेले नाहीत. दहावी-बारावीचा निकालही अद्याप लागलेला नाही. विद्यार्थी आणि पालक त्याची वाट पाहत आहेत. जुलैच्या मध्यावधीत बारावीचा आणि जुलै अखेर दहावीचा निकाल लागू शकतो, अशा माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत शिक्षण विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

दहावी, बारावी निकालाची प्रक्रिया वेगाने सुरु

यंदा मार्चच्या दहावी परीक्षेसाठी 17 लाख 65 हजार 898 आणि बारावीसाठी 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बसले होते. बारावीचे सर्व पेपर्स कोरोनामुळे लॉकडाऊनपूर्वी संपले होते, मात्र दहावीचा केवळ भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता. मात्र आता निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरु असून 15 जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरीपर्यंत दहावीचा निकाल लागू शकतो, असे सांगितले. 97 टक्के उत्तरपत्रिका या कोरोना काळात परीक्षकांकडून जमा करण्यात आल्या असून स्कॅनिंग ही वेगाने सुरु आहे, अशी माहिती शकुंतला काळे यांनी दिली.

11 वी प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित राबवा

दहावीच्या निकालानंतर सुमारे दीड महिना अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालेल. या वर्षापासून ऑनलाईन पोर्टलमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्क भरणे, डिजिटल पुस्तिका, मोबाईल अॅप अशा सुविधा देण्यात येत आहेत. 1 जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणी सत्र सुरु होईल, अशी माहिती यावेळी विभागाने दिली.
मुंबई , पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती , नाशिक या विभागांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाईन चालणार असून इतरत्र व ग्रामीण भागात ऑफलाईन प्रक्रिया चालेल. या प्रक्रिया व्यवस्थित चालतील असे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *