पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम कमी होणार

शिक्षण विभागाची युद्धपातळीवर तयारी- डॉ. राजू गुरव

पुणे – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा कधी सुरू होणार, हे अद्याप अनिश्‍चित आहे. शैक्षणिक सत्राचा कालावधीही कमी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर इयत्ता पहिली ते बारावीच्या प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम कमी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून युद्धपातळीवर कामकाज सुरू आहे.
करोनामुळे सद्यपरिस्थितीत शाळा सुरू करणे कठीण आहे. शासनाने मात्र शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शाळा बंद असल्या, तरी ऑनलाइन शिक्षणाचा अवलंब करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात शाळा सुरू करण्यास यंदा उशीर होणार हे जवळपास निश्‍चित आहे.
शालेय शिक्षण विभागाने शाळांसाठी नियमावली तयार करण्याचे कामकाज सुरू ठेवले आहे. दरवर्षी शैक्षणिक वर्ष हे दहा महिन्यांचे असते. यंदा ते कमी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने अभ्यास मंडळातील तज्ज्ञांमार्फत सर्वच शालेय वर्गांचा अभ्यासक्रम कमी करण्यासाठी कामकाज सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक वर्गाचा 20 ते 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचे नियोजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र तज्ज्ञ नियुक्त केलेले आहेत.
अभ्यासक्रम कमी करताना भविष्याच्या दृष्टीने अनावश्‍यक भाग वगळण्यात येणार आहे. अभ्यासक्रमातील संभाव्य वादग्रस्त प्रकरणे, पुनरावृत्ती टाळण्यात येणार आहे. याबाबत तज्ज्ञांचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर एकत्रित अहवाल तयार करुन तो आठवडाभरात राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे. शासनाने मान्यता दिल्यानंतरच शाळांना त्याची अंमलबजावणी करण्याबाबतच्या सूचना देण्यात येणार आहेत.
– दिनकर पाटील, संचालक, शैक्षणिक संशोधन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!