ऑनलाइन वृत्तसेवापुणे

महाराष्ट्रला हुडहुडी भरली: ग्रामीण भागात हाडे गोठवणारी थंडी

नवी दिल्ली : देशात मागील बऱ्याच दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा खाली आल्याचे लक्षात येत आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात शीतलहर आल्यामुळे महाराष्ट्रलाही हुडहुडी भरली आहे.

गेल्या दोन दिवसांत ग्रामीण भागात हाडे गोठवणारी थंडी पडली आहे. परभणीमध्ये 5.6 अंश सेल्शिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. हे तापमान सध्यापर्यंत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वाधित निचांकी आकडा दर्शवत आहे. यासोबतच बुलढाण्यातही तापमानाचाप पारा 9 अंशांवर पोहोचला. पश्चिम महाराष्ट्रात महाबळेश्वरमध्ये तापमान 11 अंशांवर आले आहे
त्यामुळे या कडाक्याच्या थंडीमुळे आता अनेक भागांमध्ये चौक आणि गल्लीबोळांच्या कोपऱ्यांवर शेकोट्याही दिसू लागल्या आहेत.

परभणीमध्ये तापमान अतिशय वेगाने कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 7 अंशांवरील तापमानाचा पारा हा अवघ्या दोन दिवसांत 5 अंशांवर आला आहे. त्यामुळे आता रस्त्यावर दिसणारी गर्दीही काहीशी कमी दिसू लागली आहे. गहू आणि हरभरा या पिकांसाठी ही थंडी उपयुक्त आहे. त्यामुळे येत्या काळातील हा गारवा पिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे.

दरम्यान, उत्तर महाराष्ट्र पूर्णपणे गारठला असून आता देश आणि राज्यातील थंडीच्या या लाटेचा परिणाम मुंबईतही पाहायला मिळत आहेत. मुख्य म्हणजे मुंबईतील तापमान आणखी कमी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नाताळ, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनाही गुलाबी थंडीचा आनंद घेता येत आहे. मुंबईतील ही गुलाबी थंडी इतरत्र भागांमध्ये मात्र आता बोचरं रुप घेत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका पाहता थंडीच्या दिवसांमध्ये नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.