समाधानकारक:कोरोना लस तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये 90% प्रभावी
जगभरातील काही मोजक्याच कोरोना लशींचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. या ट्रायलच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. आता एका कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचे परिणाम समोर आले आहेत.
Pfizer कंपनीची कोरोना लस तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये 90% प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.
अमेरिकेतील फायजर कंपनीच्या लशीत जर्मन कंपनी BioNTech ची भागीदारी आहे.
प्राथमिक अभ्यासानुसार लशीचा पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांत आणि दुसरा डोस दिल्यानंतर सात दिवसांतच सुरक्षा मिळते.
Pfizer चे चेअरमन आणि सीईओ अल्बर्ट बोर्ला म्हणाले, आमच्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलच्या सुरुवातीच्या परिणामांवरून ही लस किती सुरक्षित आहे आणि कोरोनापासून किती सुरक्षा देऊ शकते, याचा पुरावा मिळाला आहे. जगाला लस पुरवण्यासाठी आम्ही आता जवळ पोहोचलो आहेत.
दरम्यान नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात या लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी यासाठी यूएस अन्न आणि औषध प्रशासनाकडे अर्ज केला जाणार आहे.
2020 मध्येच लशीचे 50 दशलक्ष आणि 2021 मध्ये 1.3 अब्ज डोस जगाला पुरवू अशी आशा आहे, असं कंपनीनं म्हटलं आहे.
विशेष म्हणजे जगातील ही पहिली लस आहे, ज्या लशीची चाचणी लहान मुलांवरदेखील करण्यात आली आहे.