सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा:ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. दिवाळीआधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
10 हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा करताना सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहू नये म्हणून दिवाळीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल यासाठी प्रयत्न करु,असं मुख्यमंत्री म्हणाले होते. अखेर आज यासंदर्भात निर्णय झाला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आलं होतं. सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहणार नाही असं वचन सरकारने दिलं होतं. ते सरकार पूर्ण करत आहे. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरूवात होईल. ही मदत थेट खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांना दोन हफ्त्यात मदत मिळणार आहे. पहिला हफ्ता 4700 कोटीचा असणार आहे.
जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर मदत
शेती पिकासाठी जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात येईल. फळपिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर, मृतांच्या वारसांना, मयत पशुधनासाठी घरपडझडीसाठी भरीव मदत देण्यात येईल, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. नुकसानग्रस्तांकरता 10 हजार कोटी रुपयांची मदत नम्रपणे जाहीर करत आहोत, कृपाकरुन त्याचा स्वीकार करावा. दिवाळीआधी सगळ्यांपपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं होतं