चकलांब्याच्या डॉ. गौतम छाजेड व डॉ. मनीषा छाजेड दांपत्याची पुण्यात कोरोना रुग्णांसाठी मेडिको हेल्पलाइन

पुणे – पुण्यातील डॉ. गौतम छाजेड व डॉ. मनीषा छाजेड हे दांपत्य राज्यातल्या विविध जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांसाठी गेल्या सहा ते सात महिन्यांपासून “मेडिको हेल्पलाइन’च्या माध्यमातून मोफत मदत कार्य राबवत आहेत. कोरोनाची तपासणी पासून ते रुग्णांसाठी शहरात बेडची व्यवस्था करून देणे तसेच टेलिमेडिसीनच्या माध्यमातून उपचार करत रुग्णांना औषध पुरविणे व त्यांचे मार्गदर्शन करण्याचे कार्य उपक्रमाच्या अंतर्गत करण्यात येत आहे.विशेष म्हणजे छाजेड दांपत्य हे मूळचे चकलांबा ता गेवराई येथील रहिवासी आहेत त्यांच्या या कार्याचे गावातून कौतुक केले जात आहे डॉ सुवालाल छाजेड यांचे ते चिरंजीव आहेत

डॉ. गौतम म्हणाले, ‘गेल्या सात महिन्यांपासून ही हेल्पलाइन सेवा अहोरात्र सुरू आहे. सुरवातीच्या काळात कोविडची चाचणीचा अहवाल येण्यास वेळ लागत होता.
त्यामुळे रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास ते वेळेत न समजल्याने रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना देखिल संसर्ग होण्याची शक्‍यता होती. यावर उपाय म्हणून रुग्णांना लक्षणे आढळल्यास पहिल्याच दिवशी सीबीसी, सीआरपी सारख्या चाचणी करण्यास सांगण्यात येत होते. त्यामुळे फक्त चार ते पाच तासांमध्ये रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे समजण्यास मदत मिळत होती. त्यानुसार पॉझिटिव्ह रुग्णांना त्वरित उपचार सुरू करण्यासाठी सांगण्यात येत होते. या प्रक्रियेमुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळणे शक्‍य झाले. या सात महिन्यांमध्ये सुमारे 19 हजार रुग्णांचा डेटा संकलित करण्यात आला आहे.”

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना उपचारामुळे शारीरिक थकवा तसेच काहींना आर्थिक उत्पन्नाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांना मानसिक ताण निर्माण होत असल्याने या रुग्णांना ‘पोस्ट कोविड’ सेवा पुरविण्यात येते. यामध्ये रुग्णांना योग्य ते सल्ले, समुपदेशन व त्यांचे मार्गदर्शन केले जाते. सध्या “पोस्ट कोविड मॅनेजमेंटची’ गरज अधिक भासून येत असल्याचे या उपक्रमातून दिसून येत आहे. असे डॉ. छाजेड यांनी नमूद केले.

‘मेडिको हेल्पलाईनच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रातच नाही तर राजस्थान व कर्नाटक या राज्यात देखील सेवा पुरवत आहोत. सध्या विविध रुग्णालय आणि डॉक्‍टर आमच्या या उपक्रमात जोडले गेले आहेत. रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी पुढे कार्यरत राहू.”

  • डॉ. मनीषा छाजेड

कोरोना रुग्णांच्या डेटाचा असा केला जाणार अभ्यास

  • रुग्णांमध्ये तयार झालेल्या प्रतिपिंडांची भूमिका
  • कोणत्या रक्त गटांतील रुग्णांची संख्या जास्त
  • प्लाझ्मा थेरपीची भूमिका
  • रेमडेसिवर आणि फॅबीफ्लूची कार्यक्षमता
  • कोविड सेंटर अथवा घरीच क्वारंटाईन होण्याची गरज कधी
  • ‘अँटी-इंफ्लेमेटरी’ (दाहकता रोखणारे) म्हणून “स्टिरॉइड्‌स’ची भूमिका


error: Content is protected !!