शिक्षकांनो, आठवड्यातून दोन दिवस उपस्थिती आवश्यक
पुणे- शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एकाच दिवशी सर्व शिक्षकांना बोलावू नका, शक्यतो आठवड्यामध्ये एक किंवा दोन दिवसांपेक्षा जास्तवेळा बोलावू नका, अशा सूचना केल्या आहेत.
शाळांमध्ये सरसकट सर्वच शिक्षकांना दररोज बोलाविण्याचा तगादा लावला होता. याबाबत शिक्षक संघटनांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत शिक्षण आयुक्तांनी शासनाला पत्र पाठवून मार्गदर्शक सूचना मागवल्या होत्या. याबाबत शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी आदेश काढले आहेत.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक सेवांसाठीच सुरू आहेत. त्यामुळे शिक्षकांना शाळेमध्ये उपस्थित राहण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे त्यांना “वर्क फ्रॉम होम’ची सवलत दिली आहे. शाळा सुरू करण्याची तयारी व ई-लर्निंगबाबत मुख्याध्यापकांनी आठवड्यातून दोन दिवस बोलाविल्यास शिक्षकांनी उपस्थित राहाणे आवश्यक आहे. ज्यांची शाळेत उपस्थिती आवश्यक असेल त्यांना बोलाविण्याबाबत मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीला परिस्थितीनुरुप निर्णय घेता येणार आहे.
“वर्क फ्रॉम होम’ची सवलत
महिला शिक्षक, मधुमेह, श्वसन विकार, रक्तदाब, हृदयविकार आदी आजारी व 55 वर्षांवरील पुरुष शिक्षक यांना शाळा सुरू होईपर्यंत “वर्क फ्रॉम होम’ची सवलत दिली आहे. स्थानिक प्रशासनाच्या संमतीशिवाय शिक्षण विभागातील क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी शाळा सुरू करण्याबाबत व शिक्षक उपस्थितीबाबत कोणतेही निर्देश देऊ नयेत, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. कोविड आजारासंबंधित कामातून शिक्षकांना स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून कार्यमुक्त करण्याची कार्यवाही शिक्षणाधिकाऱ्यांना करावी लागणार आहे.