नौकरी नाही म्हणू नका आता रोजगार संधींची नवी पहाट;शोधा म्हणजे सापडेल

आता टाळेबंदी सैल होऊ लागल्यामुळे व्यापार-उद्योग गती घेऊ लागला आहे आणि त्यामुळे हळूहळू नोकऱ्यांच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.
दिल्ली, मुंबई, अमृतसर अशा ठिकाणचे हजारो परप्रांतीय मजूर करोनामुळे आपापल्या गावी परतले. तेथे त्यांना मनरेगामध्ये रोजगार मिळत आहे. कुरियर कंपन्या, लॉजिस्टिक्‍स सप्लाय चेनमध्ये काम करणाऱ्या कंपन्या येथे डिलिव्हरी करण्याच्या हजारो नोकऱ्या उपलब्ध होऊ लागल्या आहेत. मुंबईत दादरमध्ये एका तरुणीने, महिला या तऱ्हेचे काम करू शकतील हे हेरून, नवीन कंपनी सुरू केली आहे. दुचाकी चालवणाऱ्या महिलांना यामुळे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. कंपन्या बिझिनेस प्रोसेसिंगवरचा खर्च कमी करू लागल्या आहेत. त्यामुळे त्या मोठ्या प्रमाणावर जॉब्स आउटसोर्स करत आहेत. त्यामुळे बीपीओ कंपन्यांचे काम वाढले आहे.
अर्थात, कंपन्या स्वतः कर्मचारी ठेवून जेवढ्या खर्चात हे करून घेतात, त्यापेक्षा बाहेरून काम करून घेण्याचा खर्च कमी असतो. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून अन्य क्षेत्रांतील उद्योगधंदेही सुरू झाल्यामुळे सुरक्षारक्षक, हाउसकीपिंग, फॅसिलिटी मॅनेजमेंट या क्षेत्रांतील नोकऱ्याही उपलब्ध होऊ लागल्या आहेत. बॅंका व वित्तीय कंपन्यांकडून ज्यांनी कर्जे घेतली आहेत, अशा कर्जदारांची थकबाकी येत्या काळात वाढणार आहे. त्यामुळे कर्जाच्या हप्त्यांच्या वसुलीचे काम करणाऱ्या कलेक्‍शन टिम्स लागणार आहेत. हे काम हजारो लोकांना मिळू शकते, करोनामुळे आरोग्यक्षेत्रात नव्या संधी निर्माण होणार आहेत. विशेषतः आजारी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी फिजिओथेरपी, त्यांची देखभाल करण्यासाठी परिचारिकांना प्रचंड प्रमाणात कामे मिळू लागली आहेत.
ऑनलाइन शिक्षण, सॉफ्टवेअर तसेच हार्डवेअर कंपन्यांत जॉब निर्माण झाले आहेत. कंपन्यांचे काम आता कर्मचाऱ्यांच्या घरातून तसेच कार्यालयातून असे दोन्ही ठिकाणांहून चालत असल्यामुळे, सायबर सिक्‍युरिटी तसेच इंटरनेट डेटाची वाढती गरज लक्षात घेता, संबंधित कंपन्यांच्या व्यवसायाला वाढीची संधी आहे. “फ्युचर ब्रॅंड’ या ब्रॅंड कन्सल्टिंग व व्यवस्थापन कंपनीचे संचालक संतोष देसाई यांच्या मते, कार्यप्रणालीचे डिजिटायझेशन होणार असल्यामुळे, नवनवीन प्रकारचा रोजगार उत्पन्न होणार आहे. “नोकरी डॉट कॉम’ या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 2019च्या तुलनेत 2020 मध्ये भारतातील सर्व शहरांत नवीन नोकऱ्यांचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांनी कमी झाले होते. हॉटेल्स, रेस्तरॉं, पर्यटन व नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात नवीन नोकऱ्यांचे प्रमाण 91 टक्‍क्‍यांनी घटले. परंतु टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर हळूहळू ही परिस्थिती बदलत आहे.
“आत्मनिर्भर भारत’ या केंद्र सरकारच्या घोषणेमुळे संरक्षण, दूरसंचार, मेट्रो रेल्वे या क्षेत्रांतील अनेक कामे देशी कंपन्यांना मिळणार आहेत. त्याचाही फायदा रोजगार निर्मितीसाठी होईल. 21 जून रोजी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, 1680 कंपन्यांना 19 हजार 200 पदांसाठी माणसे हवी आहेत. ऍक्‍सेंच्युअर, आयबीएम, इन्फोसिस, टेक महिंद्रा, कॉग्निझंट, एल अँड टी अशा कंपन्यांमध्ये नवीन नोकरभरती सुरू आहे. बेंगळुरू आणि गुरुग्राम येथे उद्योगक्षेत्र पुन्हा एकदा बहरू लागले आहे.

ओएलएक्‍स पीपल या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, सुरत, बडोदे, विशाखापट्टणम, वरंगल, पाटणा, गुवाहाटी, रांची या टियर तीन व टियर चार शहरांमध्ये डिलिव्हरी, लॉजिस्टिक्‍स, फिनटेक फर्म्समध्ये आता नोकऱ्यांच्या विपुल संधी निर्माण झाल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना घरी सोडण्यासाठी अधिक व्हॅन्स लागू लागल्या आहेत. खास करून महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांना घरी सोडण्यासाठी अधिक सुरक्षारक्षकही लागणार आहेत. शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन शिक्षणावर भर आहे. कोचिंग क्‍लासेसही बंद आहेत.

कोविडपूर्व काळात दीड लाख विद्यार्थी वेदान्तुकडून लाइव्ह क्‍लासेसमध्ये बसत असत. ही संख्या आता 40 लाखांवर पोहोचली आहे. याचा फायदा उठवण्यासाठी कंपनी एक हजार अकॅडमिक काउंसिलर्स नेमणार आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना कंपनीचे अभ्यासक्रम आणि एकूण कार्यक्रम समजावून सांगणे, हे त्यांचे काम असेल. ही कंपनी चार-पाचशे नवे एज्युकेटर्स तसेच तीनशे नवे सेल्स एक्‍झिक्‍युटिव्ह नेमत आहे. एका जॉब साइट कंपनीच्या अहवालानुसार, सायबर सिक्‍युरिटी व क्‍लाउड कॉम्प्युटिंग या क्षेत्रातील नोकऱ्यांत मागच्या तीन महिन्यांत सहा टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. येत्या वर्षभरात औषधनिर्मिती कंपन्यांचीही भरभराट होणार असून, तरुणांनी या क्षेत्रात संधीचा शोध घेतला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!