बीड जिल्ह्यात आज 12 कोरोना बाधित:राज्यात 18466 तर देशात 58097 रुग्ण
बीड जिल्ह्यात आज दि 5 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1301 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 12 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1289 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 2 केज 6 शिरूर 4 असे रुग्ण आढळून आले आहेत
महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाचे 18466 रुग्ण
महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाचे 18 हजार 466 रुग्ण आले असून 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 653 रुग्ण हे ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. मात्र मुंबईत कोरोना संसर्गाने भयावह वेग पकडला आहे. या परिस्थितीबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जर प्रकरणे 20 हजारांच्या पुढे गेली तर लॉकडाऊन लागू करावा लागेल. असा इशारा दिला आहे.
त्यामुळे मुंबईत दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा पाहता लवकरचं मुंबईत लॉकडाऊन लागू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये मंगळवारी 18,466 नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक 10,860, ठाणे 1354, पुणे 1113, नाशिक 308 आणि नागपूर 192 या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता लॉकडाऊन संदर्भातील निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी विशेष बैठक घेण्यात येणार आहे.
देशात 24 तासात 58097 रुग्ण
भारतामध्ये मागील 24 तासांत 58097 नवे कोरोनारूग्ण समोर आले आहेत. तर 534 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. भारतामध्ये पॉझिटीव्हिटी रेट 4.18% आहे. देशात अॅक्टिव्ह रूग्ण 2,14,004 आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने नुकत्याच जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या वाढून दोन लाख 14 हजार 4 वर पोहोचली आहे. या महामारीत जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढून 4 लाख 82 हजार 551 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (मंगळवारी) 15 हजार 389 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 21 हजार 803 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.
तसेच आतापर्यंत देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या 2135 बाधितांची नोंद झाली आहे. या व्हेरियंटचे देशातील 24 राज्यांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र आणि राजधानी दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्ण आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर केरळ आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 653, दिल्लीत 464 आणि केरळात 185 रुग्णांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)