मोठी बातमी! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून 10वी, 12वी परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
मुंबई – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून ही परीक्षा नियमित मूल्यमापन पद्धतीने ऑफलाईनच होणार असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाच्या तयारीला लागावे लागणार आहे.
दहावीच्या परीक्षा या 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 दरम्यान पार पडणार आहेत. त्याचसोबत बारावीच्या लेखी परीक्षा या4 मार्च ते 7 एप्रिल 2022 दरम्यान पार पडणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन या परीक्षा नियमित पद्धतीने होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर इयत्ता 12 वीचा निकाल जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि इयत्ता दहावीचा निकाल जुलै 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील. कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील. तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक, पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला आहे, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.