राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर गुजरातमधून सुरुवात झाली पाहिजे
मुंबई : देशातील सर्वाधित कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तर दुसरीकडे राज्याच्या राजकारणामध्ये मात्र वेगळीच खलबतं चालली असल्याचे चित्र आहे. विरोधकांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. याविषयी सर्वात महत्वाचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
विरोधकांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर गुजरातमधून सुरुवात झाली पाहिजे. गुजरातमधील उच्च न्यायालयाने कोरोना हाताळण्यासंबंधी निष्कर्ष काढला आहे ते गंभीर आहे. सरकारी रुग्णालये अंधारी कोठड्या झाल्या आहेत. रुग्णालयांची स्मशाने झाली आहेत असे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. तेथील राज्यपांलनी मुख्यमंत्र्यांना बोलावून समज दिली पाहिजे आणि विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे’, असे संजय राऊत यांनी बोलताना सांगितले आहे.
गेल्या तीन चार दिवसात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. यादरम्यान ठाकरे सरकारच्या स्थिरतेबाबत चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बातचित केली. त्यावेळी ते बोलताना म्हणाले की, ‘महाराष्ट्राचे सरकार, ठाकरे सरकार… राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर प्रमुख पक्ष यांच्या महाविकास आघाडीचे बनले आहे. हे सरकार संपूर्ण 5 वर्षांचा कालखंड पार पाडणार असून पुढिल निवडणुकाही आम्ही एकत्रच लढणार आहोत.’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.