मराठवाड्यात यलो अलर्ट:बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईः राज्यात ऑगस्टअखेरील पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसानं मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर काही काळ उसंत घेतल्यानंतर पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. राज्यात उद्यापासून सलग तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (maharashtra Rain Update)
बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाचे क्षेत्र व त्याच्या आतल्या भागातील प्रवासाच्या शक्यतेमुळं ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान परत एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच, संपूर्ण राज्यात पावसाचा प्रभाव असण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.
३ सप्टेंबर रोजी बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावतीमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, ४ सप्टेंबरसाठी बीड, लातूर, परभणी, नांदेड, सोलापूर, सांगली आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
५ सप्टेंबर रोजी हवामान विभागानं पुणे, सातारा, रत्नागिरी, अहमदनगर आणि मराठवाडा जिल्ह्यात काही ठिकाणी विजेंच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर, ६ सप्टेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरसह, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, देशात सप्टेंबरमध्ये या महिन्याच्या सरासरीच्या ११० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे सध्या हंगामातील एकूण पर्जन्यमान सरासरीपेक्षा नऊ टक्के कमी आहे.