बीड जिल्ह्याला झोडपले:11 पैकी 7 तालुक्यात अतिवृष्टी
बीड-सोमवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने रात्रभर बीड जिल्ह्याला झोडपले, पहाटेपर्यंत सुरू राहिलेल्या जोरदार पावसामुळे बीड जिल्हा पाणीमय झाला. 11 पैकी 7 तालुक्यात अतिवृष्टी झाली.
गोदावरी, सिंदफणा, कुंडलिका नदीला पूर आला आहे. राक्षसभुवनचे शनि मंदिर आणि पांचाळेश्वर पाण्यात आहे. तर गेवराई तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये सोमवारी सायंकाळपासून मंगळवारी पहाटेपर्यंत जोरदार पावसाने मुक्काम ठोकला. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच रात्रभर पावसाने झोडपले. बीड जिल्ह्यातील 11 पैकी 7 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. बीड, पाटोदा, आष्टी, गेवराई, वडवणी, शिरूर, तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे. नदी, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. गाव तलाव तुडुंब भरले आहेत.
वडवणी तालुक्यातील कुंडलिक नदी दुथडी भरून वाहत आहे. अप्पर कुंडलिक प्रकल्पामधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शिरूर तालुक्यात उगम पावलेल्या सिंदफणा नदीलाही पूर आला आहे. अंबाजोगाई तालुक्यातही नद्या तुडूंब भरून वाहत आहेत. गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीवर असणाऱ्या गुळज बंधारा पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे.
गोदाकाठावर असणाऱ्या राक्षसभुवन येथील शनी महाराज, पांचाळेश्वर मंदिर, पाण्याखाली आहे. तर दत्त मंदिराला पाण्याने वेढा दिला आहे. गेवराई तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राजापूर गावाला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. अंथरवली येथील लोकवस्तीमध्ये पाणी घुसले आहे.
वडवणी तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. केज शहरातील नदीलाही यंदा पहिल्यांदाच पूर आला आहे. तर माजलगाव येथील मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक मोठया प्रमाणावर सुरू असल्याने प्रकल्पातील पाणीसाठा 47.76 टक्क्यावर गेला आहे