महाराष्ट्रमुंबई

करोनाग्रस्त मंत्र्याला एअरलिफ्ट करण्याची परवानगी नाकारली

झारीतील शुक्राचाऱ्याचे यातही राजकारण

कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आलेल्या राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना विमानानं मुंबईत हलवण्याची परवानगी देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते, राज्याचे मंत्री व माजी मुख्यमंत्री यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नांदेड येथून मुंबईला विमानाने हलविण्यासाठी मागितलेली परवानगी प्रशासनाने दिली नाही. प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील संबंधित मंत्र्यांना तात्काळ विमानाने मुंबईला घेऊन येण्यासाठी सांगितलेले असतानाही झारीतील शुक्राचार्यांनी आपल्या लालफितीचा तडाखा काय असतो ते दाखवून दिल्याने या प्रकरणाबाबत राजकीय क्षेत्रात उलट सुलट चर्चांना उत आला आहे.
राज्याचे एक माजी मुख्यमंत्री व सध्या राज्यमंत्री मंडळातील एक महत्त्वाचे खाते असणारे काँग्रेसचे नेते हे दोन दिवसांपूर्वीच नांदेड येथे गेले होते. त्यांनी मुंबईत दोनदा स्वतःच्या करोनाच्या चाचण्या करून घेतल्या होत्या. त्या निगेटीव्ह आल्या होत्या. मात्र नांदेडला गेल्यावर त्यांनी पुन्हा एकदा चाचणी करून घेतली ती पॉझिटिव्ह आली. खरेतर त्यांना करोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती. मात्र अनेकदा लोकांमध्ये वावरावे लागते त्यामुळे त्यांनी काळजी म्हणून या चाचण्या करून घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर पुढे आणखी काही वैद्यकीय गुंतागुंत वाढायला नको म्हणून त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबईतील रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. तसे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवले. उद्धव यांनीही त्यांचा हा निर्णय योग्य असल्याचे सांगून मी लगेचच विमानाद्वारे तुम्हाला मुंबईला आणण्यासाठी योग्य ते निर्देश देतो, असे त्यांनी सांगितल्याचे समजते. मात्र करोनाच्या रुग्णाला विमानाद्वारे हलवता येणार नाही, असा नियम राज्यातील एका मोठ्या अधिकाऱ्याने दाखवत याबाबत काहीही करण्यास असमर्थता दर्शविल्याचे समजते. यानंतर संबंधित मंत्रीमहोदय हे अॅम्ब्युलन्सने नांदेड ते मुंबई हा ५७३ किलोमीटरचा प्रवास रस्त्याने करत निघाले.
याबाबत अधिक चौकशी केली असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वेगळीच माहिती देण्यात आल्याचेही लक्षात आले. कोविड रुग्णाला विमानाने नेता येते, असा केंद्राने नवा नियम केला असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कानावर घालण्यात आले. तर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना विमान कंपन्या कोविड रुग्णासाठी विमान द्यायलाच तयार नसल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *