ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

राज्यात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठवणार-मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले ‘हे’ निर्देश

मुंबई: राज्यातून करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत आहे. प्रमुख शहरांमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. त्यासोबत ग्रामीण भागातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याने तसेच म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या आजाराचे रुग्ण वेगाने वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या सर्व बाबतीत सखोल चर्चा करण्यात आली. त्यात लॉकडाऊन हा सुद्धा चर्चेचा प्रमुख विषय होता आणि सरसकट लॉकडाऊन न उठवता हळूहळू टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठवावा, असे मत अनेक मंत्र्यांनी मांडले. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित विभागास लगेचच निर्देश दिले आहेत.

राज्यात करोना रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी १० ते १५ जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या उच्चांकी पातळीवर पोहचली होती. आजची राज्यातील रुग्णसंख्या कमी कमी होऊन सप्टेंबरच्या आकडेवारी एवढी झाली आहे. मात्र आपल्याला अजून काळजी घेणे भाग आहे, असे मंत्रिमंडळाचे मत बनले आहे. राज्यात करोनासोबतच म्युकरमायकोसिस या आजाराचा धोकाही वाढतो आहे. त्यामुळे त्याबाबतही खबरदारी घ्यावी लागणार आहे. म्हणून राज्यात एकदम लॉकडाऊन न उठवता १ जूननंतरही लॉकडाऊन वाढवून मग हळूहळू टप्प्याटप्प्याने निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात यावी. प्रथम आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करण्यात यावेत, अशीही मंत्रिमंडळात चर्चा झाली. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित विभागास लगेचच निर्देश दिले असल्याचे सांगण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर जी माहिती मिळाली आहे ते पाहता लॉकडाऊन १ जूननंतरही कायम राहणार हे निश्चित झाले आहे. त्यात टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील केले जाणार हेसुद्धा स्पष्ट असून नेमकी कोणती मुभा मिळणार आणि कधीपासून मिळणार, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. याबाबत ३० किंवा ३१ मेच्या आसपास नवा आदेश जारी होण्याची शक्यता आहे. त्यात सध्या जे निर्बंध लागू आहेत तेच निर्बंध १ जूननंतरही लागू राहणार का, नवा आदेश किती दिवसांसाठी असेल?, जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर रेड झोन वगळता उर्वरित भागात हे निर्बंध काही प्रमाणात शिथील होणार का, हे सर्व प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहेत. मुंबई, ठाणे, पालघर हे जिल्हे रेड झोनमध्ये नाहीत. त्यामुळे निर्बंध शिथील झाल्यास या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *