दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द:बारावी बोर्डाच्या परीक्षा होणार
मुंबई, 20 एप्रिल: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. याची माहिती मंत्री राजेश टोपे यांनी दिली असून या सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तर बारावी बोर्डाच्या परीक्षा होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
दहावी बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाली. यावर्षी परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात यावे यासंदर्भात मंत्रिमंडळात एकमताने निर्णय झाला असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं, दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांचं इंटरनल असेसमेंट होणार असून त्या संदर्भात शिक्षण क्षेत्रातील तज्ञांसोबत चर्चा करुन सविस्तर माहिती जाहीर करण्यात येईल. तर बारावीची परीक्षा मे अखेरीस होण्याची शक्यता आहे.
दहावीच्या शाळा यंदा ऑनलाईन पद्धतीने झाल्या त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र, या संदर्भात काही असेसमेंट घ्यायच्या असतील तर त्यासंदर्भातला निर्णय घेण्यात येईल असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वीच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक पत्रकार परिषद घेत 10वी, 12वीच्या परीक्षांच्या संदर्भात महत्वाची माहिती दिली होती. यंदा 10वी आणि 12वीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार असून लेखी परीक्षेसाठी वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.