उस्मानाबाद जिल्हात आढळले दोन कोरोना पॉझिटिव्ह
उस्मानाबाद प्रतिनिधी
शिराढोण ता.कळंब व उमरगा शहर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून नागरिकांनी विशेष अडचण असल्यास प्रशासनास एसएमएस करावा असे आवाहन आ राणाजगजितसिंह पाटील
कळंब तालुक्यातील शिराढोण येथे नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गाव कंटेनमेंट एरिया घोषित केला आहे. या अनुषंगाने गावातील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी बोलून सूचना देण्यात आल्या आहेत. गावातील नागरिकांना काही अडचण असल्यास त्वरित प्रशासनास एसएमएस द्वारे कळवावे. ज्यामुळे प्रशासनाकडे त्याची नोंदही राहते व मदत करण्यास सोपे जाते. परिसरातील गावांच्या नागरिकांनी देखील सतर्कता बाळगून शिराढोण येथे कोणीही जाण्याचा प्रयत्न करू नये. या रुग्णाला प्रादुर्भाव कुठे आणि कोणामुळे झाला? हे खात्रीलायक कळत नसल्यामुळे सर्वांनी दक्ष राहण्याची गरज आहे. रुग्णावर सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे उपचार सुरु आहेत. लातूरचे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी बोलणे झाले असून रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने रुग्णाच्या एका नातेवाईकाला रुग्णालयातच कॉरंटाईन केले आहे. तर इतर ४ नातेवाईक व संपर्क आलेल्या एका व्यक्तीचे असे एकूण ५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांचा रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. रिपोर्ट आल्यानंतर पुढे नेमकं काय करायचं हे ठरवता येईल. उमरगा शहरात देखील आताच एक कोरोना पेशंट आढळून आल्याने समजते. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय, उमरगा येथे उपचार सुरू आहेत. सदरील रुग्ण पुण्यातूनच उमरगा येथे आल्याची माहिती मिळत आहे. मुंबई-पुणे व इतर मोठ्या शहरातून तसेच इतर राज्यातून असंख्य बांधव व भगिनी आपल्या जिल्ह्यात स्वगृही परतत आहेत. यातील अनेक बांधव-भगिनी Covid-19 पॉझिटिव्ह असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. सध्याची परिस्थिती पाहता येणाऱ्या काही दिवसात देखील यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता खरंच सतर्क राहून काळजी घेणे अत्यंत गरजचे झाले आहे. फेस मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा, सामाजिक अंतर ठेवा तसेच प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करा. स्वतःची, कुटुंबाची व इतरांची काळजी घ्या. असे आवाहन आ राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.