ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

आरोग्य संस्थांना लॉकडाऊन लागू नाही-वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

वैद्यकीय शिक्षण प्रणालीत येणाऱ्या संस्था लॉकडाऊनमधून वगळण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रशासनाकडून महाविद्यालय बंद न करण्याच्या सूचना, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि शासनाकडून जिल्हा यंत्रणेला देण्यात आलेल्या आहेत. होमीओपॅथी, नर्सिंग अशा विद्यापीठाशी संलग्न असणारे अभ्यासक्रम, विद्यालय लॉकडाऊनमधून वगळण्यात आलेले आहेत. याबाबत काही शंका असल्यास संचालनालय अथवा विभागाशी संपर्क साधावा, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.

महाविद्यालयांनी कोविड नियमांचे पालन करावे.

वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्नित महाविद्यालयांनी शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असून याबाबत संस्थांनी गांभीर्यपूर्वक दक्षता घेतली पाहिजे. त्याचबरोबर संस्थेत कोणालाही कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांचे लसीकरण तातडीने करुन घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

मृत्यूदर कमी तर बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त असावे

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मृत्युदर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे दर्जेदार आणि चांगले उपचार देऊन रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले पाहिजे.सर्व सोयी-सुविधा पुरविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. सामान्यांना दिलासा देण्याचे काम प्रशासनाने करावे.असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.