अचानक कोरोना रुग्ण वाढीचे कारण कोणते?तज्ञ समिती अहवालात चिंता
मुंबई, – सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जनतेसाठी खुली केल्याने आणि ग्रामपंचायत निवडणुकांमुळे महाराष्ट्रातील करोनाची स्थिती चिंताजनक बनली. फेब्रुवारीपासून जरी विदर्भात साथ वाढल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात अनेक भागात लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण केंद्र सरकारने पाठवलेल्या तज्ज्ञांच्या समितीने व्यक्त केले आहे.
करोनाच्या विषाणुतील जनुकीय बदलामुळे संसर्ग वाढत असल्याचे सुरवातीला मानण्यात येत होते. मात्र असे बदल झालेले विषाणू 2020 पासून आढळत असल्याचे अभ्यासात स्पष्ट झाल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव निपूण विनायक, राष्ट्रीय साथ नियंत्रण केंद्राचे उपसंचालक संकेत कुलकर्णी आणि राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे प्राध्यापक आशीष रंजन यांनी एक आणि दोन मार्चला भेट देऊन पाहणी केली.
त्यांनी शनिवारी सादर केलेल्या अहवालात काही मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे.
करोनाची कमी झालेली भीती, साथीमुळे आलेले नैराश्य, सुपर स्प्रेडर शोधण्यात आलेले अपयश, ग्रामपंचायत निवडणुकांमुळे आलेला आक्रमकपणा, विवाहाचा हंगाम, शाळा सुरू होणे आणि भरगच्च सार्वजनिक वाहतूक आदी कारणांचा सरकारला दिलेल्या या अहवालात समावेश आहे.
करोनाची दुसरी लाट येण्याची भीती निर्माण झाली असताना राज्यात काही जिल्ह्यात शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मर्यादित लॉकडाऊनचा पर्याय काही ठिकाणी निवडण्यात आला आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या बाजूचे आपण नाही, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात एकूण झालेली बाधितांच्या संख्येतील वाढीमागे मुंबईत लोकल सेवा सामन्यांसाठी खुली करण्याच्या निर्णयाबद्दल स्वतंत्र उल्लेख नाही. मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत असणारी गर्दी हे एक कारण असल्याचे म्हटले आहे. जानेवारी महिन्यात राज्यात 12 हजार 711 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या. तेही करोनावाढीला निमित्त ठरल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.