महाविद्यालयांतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई । महाराष्ट्र पशु विज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि घटक महाविद्यालयातील शिक्षण व शिक्षक समकक्ष पदांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारीत वेतन लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
या निर्णयामुळे विद्यापीठ आणि घटक महाविद्यालयातील शिक्षकांसोबत विद्यापीठ अनुदान आयोग, भारतीय पशु चिकित्सा परिषद, भारतीय कृषि अनुसंधान परिषद आणि राज्य शासन यांनी शिक्षक समकक्ष म्हणून घोषित केलेल्या पदांना लाभ होणार आहे. वेतनाचे स्तर, सुरुवातीचे वेतन आणि कुलगुरु यांचे वेतन निश्चित करण्यात येईल. या पदांना सुधारीत वेतन संरचना आणि महागाई भत्ता व इतर भत्ते १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येणार आहेत. या निर्णयाचा लाभ ३८८ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदांवर कार्यरत व्यक्तींना होणार आहे. याकरिता १७.९४ कोटी रुपये एवढा निधी थकीत रकमेसाठी तसेच १२ कोटी एवढा निधी वार्षिक खर्चासाठी देण्यात येईल.