बलात्काराचा प्रयत्न करणार्या आरोपीस पाच वर्षे सक्त मजुरी
बीड(प्रतिनिधी)-बीड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने पिडीत अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणार्या आरोपीस पाच वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, गेवराई तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर शेजारीच राहणारा आरोपी मुन्ना उर्फ विनोद उबाळे याने त्याच्या घरात नेवून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने सदर घटनेची फिर्याद तलवाडा पोलिस ठाण्यात दिल्यानंतर आरोपी विरुध्द कलम 376 भादंवि व कलम 4 पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.
त्यानंतर पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास करुन आरोपी हा अल्पवयीन असल्याने बाल न्यायमंडळ बीड येथे आरोपीविरुध्द आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर बाल न्याय मंडळाने आरोपीचे गुन्ह्याच्या वेळीचे वय विचारात घेऊन व आरोपीने केलेल्या गुन्ह्याची त्याला पूर्ण समज असल्याने सदर प्रकरण विशेष पोक्सो न्यायालयाकडे वर्ग केले होते. सदरील प्रकरण हे बीड येथील विशेष पोक्सो न्यायालयात सुनावणीनंतर व सरकार पक्षाने सादर केलेल्या पुरावा ग्राह्यधरुन बीड येथील विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश श्री.एम.व्ही.मोराळे साहेब यांनी आरोपीस कलम 376 (2) (1) सह कलम 511 भादंवि व पोक्सो कायदा कलम 10 मध्ये दोषी आढळल्याने त्यास पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड.मंजुषा दराडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी बिनवडे व महिला पोलिस शिपाई नागरगोजे यांनी सहकार्य केले.