महाराष्ट्रमुंबई

शर्जिलला बेड्या पडतीलच. निश्चिंत रहा! ठाकरेंच्या राज्यात हिंदूच काय प्रत्येक घटक सुरक्षित आहे-शिवसेना

मुंबई: ‘शर्जिल उस्मानी हिंदुत्वाविरोधात जे बरळला ते गंभीरच आहे. त्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणून त्याच्यावर कठोर कारवाई करावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे, पण भाजप व देवेंद्र फडणवीस यांनी इतकी आदळआपट करायची गरज नाही. शर्जिलला बेड्या पडतीलच. निश्चिंत रहा! ठाकरे राज्यात हिंदूच काय, समाजातला प्रत्येक घटक सुरक्षित आहे,’ असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.

पुण्यात ३० जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत शर्जिल उस्मानी नामक तरुणानं हिंदू समाजाविरोधात अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. त्यावरून संताप व्यक्त होत आहे. भारतीय जनता पक्षानं शर्जिलविरोधात आघाडीच उघडली असून फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. हिंदुत्व रस्त्यावर पडले आहे काय, असा सवाल करत, फडणवीस यांनी सत्ताधारी शिवसेनेलाही घेरलं आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून आज शिवसेनेनं शर्जिल उस्मानीचा समाचार घेतानाच फडणवीसांनाही टोले हाणले आहेत.

शर्जिलसारखे कित्येक किडे-मकोडे आले व गेले. महाराष्ट्रात हिंदुत्वाचे एक पानही त्यांना खुडता आले नाही. शर्जिलसारखे साप अलिगढच्या बिळातच काय, तर पाताळात लपून बसले तरी त्याला खेचून आणण्याची हिंमत महाराष्ट्र पोलिसांत आहे हे काय फडणवीस यांना माहीत नाही? तेसुद्धा कालपर्यंत राज्यकर्ते होतेच. त्यांच्या मनात तरी महाराष्ट्र पोलिसांच्या क्षमतेविषयी शंका असू नये.

हिंदुत्व रस्त्यावर पडले आहे काय, हा फडणवीसांचा प्रश्न योग्यच आहे. पण दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी ९० दिवसांपासून रस्त्यावर पडले आहेत. ते सर्व शेतकरी हिंदूच आहेत. त्यांना सन्मानाने घरी कधी पाठवणार ते सांगा. हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्याचे पाणी, विजेचे कनेक्शन कापले. त्याच्यासमोर खिळ्यांची बिछायत अंथरली. हा समस्त हिंदू शेतकऱ्यांचा सन्मान म्हणावा काय? भाजप पुढाऱ्यांनी रस्त्यावरच्या या हिंदुत्वाची थोडी फिकीर केली तर बरे होईल.

शर्जिलसारख्या हिंदुत्वद्रोही घाणीचा उगमाचे धागेदोरे शेवटी योगी राज्यातच जातात. हिंदुत्वविरोधी कारवायांची फॅक्टरी ही उत्तरेत आहे व तेथून तयार झालेला माल देशभरात जात असतो. हा शर्जिलही आता पळून उत्तर प्रदेशातील अलिगढला लपला आहे. महाराष्ट्राचे पोलीस अलिगढला जाऊन या शर्जिलच्या मुसक्या आवळतीलच, पण थोडी जबाबदारी योगी राज्याचीसुद्धा आहे.

यूपीमध्ये लपून बसलेल्या शर्जिलला महाराष्ट्र पोलिसांच्या हवाली करण्याची जबाबदारी योगी सरकारचीही आहे. याकामी कोणी हस्तक्षेप करू नये. कारण महाराष्ट्राने एखाद्या गुन्हेगारावर कारवाई करावी व इतर राज्यांतील भाजप शासकांनी त्या गुन्हेगारांना विशेष सुरक्षा कवच बहाल करावे, असे प्रकार अलीकडे वारंवार घडू लागले आहेत. शर्जिललाही विशेष संरक्षण मिळणार नाही ना, ही शंका म्हणूनच आहे.

शर्जिलसारख्या कमअस्सल अवलादीच्या बोकडांनी शिंतोडे उडवले म्हणून हिंदुत्वाचे तेज कमी होणार नाही, पण म्हातारी मेल्याचे दुःख नसून काळ सोकावत जातो. महाराष्ट्रात शिवसेना आहेच. सरकारचे सूत्रधार ठाकरे आहेत. त्यामुळे कायदा आहे तसा हाती दंडुकाही आहेच. म्हणूनच हिंदुत्वावर वाकडेतिकडे हल्ले कोणीच सहन करणार नाही.