ऑनलाइन वृत्तसेवा

दहा हजाराची लाच घेताना महावितरणचा कनिष्ठ अभियंता रंगेहात पकडला

यवत – दौंड तालुक्‍यातील पिंपळगाव येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास तक्रारदाराकडून 10 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (दि. 1) पिंपळगाव येथील महावितरणच्या कार्यालयात सापळा रचून रंगेहात पकडले.

राहुल श्रीरंग लकडे असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक ज्योती पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे महावितरण विभागाचा माजी कर्मचारी असून या कर्मचाऱ्याला त्यांच्या पोल्ट्री शेडला विद्युत कनेक्‍शन घ्यायचे होते.

कनेक्‍शन घेण्यासाठी लकडे यांनी तक्रारदाकडे 10 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार आज (दि. 1) रोजी पथकाने पिंपळगाव येथील महावितरणच्या कार्यालय परिसरात सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून 10 हजारांची लाच स्वीकारताना राहुल लकडे यास लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेत यवत पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.