नवीन नोटा आल्यावरच जुन्या होणार बाद:10 च्या नाण्याबाबत अफवा नको:RBI ची माहिती
भारतीय रिझर्व्ह बँकेने 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा या आर्थिक वर्षाच्या अखेरीस किंवा एप्रिल 2021 पर्यंत व्यवहारातून बाद केल्या जातील असं सांगितलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहायक महाव्यवस्थापक बी महेश यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, या जुन्या नोटांची मालिका मागे घेण्याच्या योजनेवर आरबीआय सध्या काम करत आहे. पण नोटा बाद करण्याआधी 100, 10 आणि 5 च्या नवीन नोटा बाजारात आणल्या जातील अशीही माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या नोटांवर बंदी नसून बाजारात नव्या नोटा आल्या की जुन्या नोटा बाद होतील.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2019 मध्ये 100 रुपयांची नवीन नोट चलनात आणली होती. खरं तर नोटाबंदीच्या वेळी 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्याने गोंधळ झाला होता. यामुळे आता आरबीआय अचानक कोणतीही जुनी नोट बंद करू इच्छित नाही, तर प्रथम त्याची नवीन नोट बाजारात चलनमध्ये आणली जाईल. त्यानंतरच जुन्या नोटा चलनातून काढल्या जातील असे आरबीआयचे म्हणणे आहे. दहा रुपयांच्या नाण्यांविषयी वेगवेगळा अफवा पसरविल्या जातात.
अनेक व्यापारी किंवा दुकानदार त्यांना घेण्यास नकार देत आहेत. यावर आरबीआयचे म्हणणे आहे की, ही बँकेसाठी अडचण आहे, म्हणून अशा अफवा टाळण्यासाठी बँक वेळोवेळी सल्ला देते. तरी देखील अनेक लोक चलनामध्ये 10 रुपयांचे नाणे घेण्यास नकार देतात. यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरी लोकांनी दहा रुपयांच्या नाण्यांविषयी कोणत्याही अफव्यांवर लक्ष देऊ नये.