बीड

शेतकऱ्याला दरमहा ५० बॅग खतेच खरेदी करता येणार

शेतकऱ्याला दरमहा ५० बॅग खतेच खरेदी करता येणार
बीड : केंद्र शासनाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना अनुदानित खत आता दरमहा ५० बॅग इतकेच खरेदी करता येणार आहे. यापूर्वी खतांची खरेदी -विक्री अमर्यादित होत होती. मात्र आता त्याला लगाम घालण्यात आला आहे.

यापुढे आधारकार्ड नुसार एका शेतकऱ्याला केवळ ५० बॅग खताची खरेदी महिन्याला करता येणार आहे. मागील आठ महिन्यांपासून दर महिन्याला जादा खत विक्री केल्याच्या कारणावरून खत विक्रेत्यांवर कारवाया होत होत्या. त्यामुळे ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनमोहन कलंत्री, महासिचव प्रवीणभाई पटेल, कोषाध्यक्ष आबासाहेब भोकरे, प्रवक्ता संजय रघुवंशी यांनी हा प्रश्न केंद्र सरकारकडे लावून धरला. खत विक्री प्रणालीत (पीआएस मशिनमध्येच)लॉक सिस्टिम लागू करावी, प्रति शेतकरी खत मर्यादा निश्चित करावी अशी मागणी करण्यात आली होती.

त्यावर विचार करून केंद्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. रसायन व उर्वरक मंत्रालयाचे डीबीटी संचालक निरंजन लाल यांनी याबाबत २१ जानेवारीला कृषी यंत्रणेला पत्राद्वारे सूचित केले आहे. या निर्णयामुळे खत वितरण प्रणालीत पारदर्शकता येणार असल्याचे ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी सांगितले.