राज्यात सर्वाधिक जागा जिंकत शिवसेनेने मैदान मारलं:भाजप दुसऱ्या क्रमांकावर
राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करण्यात येत होता. अखेर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून, शिवसेनेनं ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत मैदान मारलं आहे. भाजपा दुसऱ्या क्रमांकावर असून, काँग्रेसच्या जागांपेक्षा विजयी झालेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त आहे.
राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर किंवा पक्षांच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत. परिणामी सर्वच राजकीय पक्षांकडून सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला जातो व या वेळीही तसाच दावा सर्वपक्षीयांनी केला होता. १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा भाजपा व महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात आला होता.अखेर निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे.
१२,७११ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं ३ हजार ११३ जागां जिंकल्या असून, सर्वाधिक जागा जिंकणारा पहिल्या क्रमाकाचा पक्ष ठरला आहे. भाजपानं २ हजार ६३२ जागा जिंकल्या असून, दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी २४०० जागांसह तिसऱ्या क्रमाकावर आहे. काँग्रेसनंही राज्यात १८२३ जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ३६ जागी विजय मिळविला आहे. तर २ हजार ३४४ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी झालेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या काँग्रेसच्या जागापेक्षा अधिक आहे.
विदर्भात काँग्रेस व भाजप या दोघांनाही यश मिळाले. मराठवाडय़ात महाविकास आघाडीचा वरचष्मा राहिला.